संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी वन विभागालाही समतल चर खोदण्यासह जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या कामांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पुनर्भरणालाही मदत होणार आहे. तसेच दुष्काळ व टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी तहसील कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. दुष्काळ व टंचाई उपाययोजनांसंदर्भात तहसीलदार मांजरे यांनी शनिवारी (दि.31) तहसील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी ते पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने टंचाई आढावा बैठका घेऊन दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार तालुक्यातील पर्जन्यमान, पीक नुकसान, पीकविमा, रब्बी हंगामाचे नियोजन, चारा व पाण्याची उपलब्धता, टंचाई निवारण आणि रोजगार निर्मिती या विषयांचा तहसील कार्यालयामार्फत नियमित आढावा घेण्यात येत आहे.
टंचाईच्या परिस्थितीत नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. यासाठी पाणीपुरवठा, चारा उपलब्धता, जलसंधारणाची कामे, रोजगारनिर्मिती आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय यांचा दर मंगळवारी आढावा घेण्यात येईल. संबंधित विभागांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच पीक कापणी प्रयोगांची कार्यवाही सुरू आहे. रब्बी हंगामासाठी चारा नियोजन, गाळ काढणे, तलावांचे खोलीकरण करण्यावर भर, टंचाई कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या 59 गावांसह लगतच्या गावांमध्येही आवश्यक कामे निश्चित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगितले.
पीक नुकसान भरपाईसाठी कार्यवाही सुरू…
संगमनेर तालुक्यातील 174 गावांमधील एकूण 1 लाख 23 हजार 73 खातेदारांच्या अनुषंगाने पीक नुकसान व मदतीबाबतची कार्यवाही सुरू आहे. पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे 39 हजार 667 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्याचे अंदाजित नुकसान 33 कोटी 70 लाख रुपये आहे. फळपिकांचे 4 हजार 929 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अंदाजित नुकसान 11 कोटी रुपये आहे. दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या क्षेत्रासंदर्भातील उपलब्ध नोंदींमध्ये 82 हजार 138 हा आकडा आणि 108 कोटी 63 लाख रुपयांची रक्कम नमूद आहे. तर दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 4 हजार 833 खातेदारांचे 4 हजार 113 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अंदाजित नुकसान 4 कोटी 76 लाख रुपये आहे.
डिजिटल पीक सर्वेक्षण…
संगमनेर तालुक्यात एकूण 2 लाख 43 हजार 829 प्लॉट असून, 1 लाख 26 हजार 430 खातेदारांच्या पीक सर्वेक्षणाच्या नोंदी पूर्ण झाल्या आहेत. क्षेत्रनिहाय सर्वेक्षणाची प्रगती 59.45 टक्के असून, या कामासाठी 324 सर्वेक्षक कार्यरत आहेत. ज्या शेतकर्यांचे डिजिटल पीक सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून पुढील पाच दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी उर्वरित सर्वेक्षण विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहनही तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले.




