Monday, November 9, 2026
HomeनगरShrirampur : दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया; शेतीला जोडधंदा म्हणून केलेले गोपालनही अडचणीत

Shrirampur : दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया; शेतीला जोडधंदा म्हणून केलेले गोपालनही अडचणीत

चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चामुळे दूध उत्पादन घटण्याची भीती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राज्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात यंदा ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाचा संपूर्ण खरीप हंगाम अक्षरशः वाया गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न 90 टक्क्यांहून अधिक घटले आहे. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी शेतीला भक्कम आधार म्हणून गोपालन आणि दुग्धव्यवसाय जोपासला होता. मात्र, आता निसर्गाच्या लहरीपणाचा आणि तीव्र चारा टंचाईचा फटका या जोडधंद्यालाही बसला आहे. चार्‍याची अनुपलब्धता आणि पशुखाद्याचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकर्‍यांचा हा एकमेव तारक ठरणारा दुग्धव्यवसाय सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

पूर्वी मक्याच्या हिरव्या चार्‍याचे दर प्रतिटन 1 हजार 800 ते 2 हजार 200 रुपयांच्या घरात होते. मात्र, पाण्याचा अभाव आणि तीव्र दुष्काळामुळे चार्‍याची उपलब्धता प्रचंड रोडावली आहे. परिणामी, आज हेच दर थेट प्रतिटन 4 हजार ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, मक्याची कुट्टी करून ती हवाबंद बॅगमध्ये भरून थेट घरपोहोच मागवल्यास शेतकर्‍यांना प्रतिटन 5 हजार ते 5 हजार 800 रुपये मोजावे लागत आहेत. गावापासून दूर अंतरावर किंवा वाड्या-वस्त्यांवर शेती करणार्‍या शेतकरी बांधवांना अतिरिक्त वाहतूक खर्चामुळे याहूनही अधिक दर मोजावे लागत आहेत. याशिवाय इतर प्रकारच्या हिरव्या चार्‍याच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याने जनावरांचे दैनंदिन संगोपन करणे शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे.

खरीप हंगाम हातातून गेल्यावर शेतकर्‍यांच्या आशा आगामी रब्बी हंगामावर होत्या. परंतु, सिंचनासाठी पाण्याची तीब्र टंचाई असल्याने गव्हाची पेरणी व उत्पादनाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्याने गाळपा गेलेला ऊस आता उपलब्ध नाही, परिणामी उसाच्या हिरव्या चार्‍याचा हक्काचा पर्यायही संपुष्टात आला आहे. नाईलाजास्तव जनावरांना जगवण्यासाठी बाजारातून विकतचा चारा आणण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. आगामी कडक उन्हाळ्याच्या दिवसांत निर्माण होणारी चार्‍याची टंचाई डोळ्यांसमोर ठेवून अनेक शेतकर्‍यांनी आतापासूनच कोरडा चारा साठवण्यास सुरुवात केली आहे.

सोयाबीनचे भूस, तुरीचे भूस, मक्याचे धाटे, बाजरीचा कडबा आणि ज्वारीचा कडबा हे कोरड्या चार्‍याचे प्रमुख पर्याय मानले जातात. परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे सोयाबीनची वाढ खुंटल्याने आणि उत्पादन घटल्याने सोयाबीनच्या भुसाची बाजारातील उपलब्धताही रोडावली आहे. त्यामुळे केवळ हिरवा चाराच नव्हे, तर कोरड्या चार्‍याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने पशुपालकांची चिंता अधिकच वाढली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे जमिनीचे क्षेत्र अत्यंत कमी आहे, मात्र दुभत्या जनावरांची संख्या जास्त आहे, अशा अल्पभूधारक शेतकर्‍यांना विकतच्या चार्‍यावरच पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे. काही शेतकरी आधुनिक पद्धतीने मुक्त संचार गोठा (गोठ्यांद्वारे जनावरांचे संगोपन करतात.

या पद्धतीमध्ये जनावरांचा चारा, पशुखाद्य, वेळोवेळी होणारा औषधोपचार आणि देखभालीचा खर्च आधीच मोठा असतो. त्यातच दुष्काळामुळे चार्‍याचे दर दुप्पट झाल्याने एकूणच गोपालनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. श्रीरामपूर परिसरातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण पूर्णपणे दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. परंतु, चार्‍याची वाढलेली खरेदी किंमत, महागडे पशुखाद्य आणि जनावरांच्या आरोग्यावरील वैद्यकीय खर्च यामुळे या व्यवसायातील नफ्याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. एका बाजूला शेतीचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले असताना, दुसर्‍या बाजूला जोडधंदाही तोट्यात चालल्याने शेतकरी वर्ग दुहेरी आर्थिक संकटात अडकला आहे. जनावरांना पुरेसा, पौष्टिक आणि सकस चारा न मिळाल्यास त्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि पर्यायाने दूध देण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होतो.

आधीच दुष्काळाचे सावट असताना जनावरांचे दूध उत्पादन घटल्यास शेतकर्‍यांच्या हातातील रोजचा हातभारही नाहीसा होईल. त्यामुळे आगामी काळात हे चारा टंचाईचे संकट अधिक उग्र रूप धारण करण्याची भीती व्यक्त होत असून, शासन स्तरावरून तातडीने जनावरांसाठी चारा छावण्या किंवा अनुदानित चारा उपलब्ध करून द्यावा, अशी आर्त हाक राहाता परिसरातील शेतकरी व पशुपालक देत आहेत.

दुग्ध व्यवसायापुढील प्रमुख आव्हाने
चार्‍याचे दर गगनाला : मक्याचा चारा प्रतिटन 4,500 ते 5,800 रुपयांवर पोहोचला.
वाहतूक आणि पशुखाद्य : डिझेल व वाहतूक खर्चामुळे पशुखाद्याचे दर वाढले.
उत्पादनाचा खर्च दुप्पट : चारा, औषधोपचार आणि देखभालीचा खर्च वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले.
दूध उत्पादनात घट : सर्के चार्‍याअभावी जनावरांच्या आरोग्यावर व दूध क्षमतेवर विपरीत परिणाम झाल्याने दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : घरबसल्या करा रासायनिक खतांचे बुकिंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली 22 ऑक्टोबरपासून...