Thursday, October 8, 2026
Homeक्राईमCrime News : सायखिंडी फाटा येथे 152 किलो गांजा पकडला

Crime News : सायखिंडी फाटा येथे 152 किलो गांजा पकडला

एलसीबी व संगमनेर शहर पोलिसांची कारवाई || 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ओडिशा राज्यातून पुण्याकडे विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 152.61 किलो गांजा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने सायखिंडी फाटा (ता. संगमनेर) येथे सोमवारी (दि.5) कारवाई करून जप्त केला. या गांजाची किंमत 76 लाख 30 हजार 500 रुपये असून, गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार, मोबाईल, रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण 88 लाख 77 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत दत्तात्रय नानाभाऊ इचके (वय 33) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (वय 35, दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते. सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना नाशिकहून संगमनेरच्या दिशेने कारमधून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायखिंडी फाटा येथे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. संशयित कार आढळल्यानंतर ती थांबवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजासह 12 लाख रुपये किमतीची कार, दोन मोबाईल, 17 हजार 970 रुपये रोख, दोन नंबर प्लेट, प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकामे पुडके तसेच आधार व एटीएम कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपींनी हा गांजा ओडिशा राज्यातील ‘कुंफू’ नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. तसेच हा माल साहेबराव उर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले (रा. कान्हूर मसाई, ता. शिरूर) आणि विशाल उर्फ दाद्या (रा. पुणे) यांना देण्यासाठी नेला जात असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, गांजाचा पुरवठा आणि वितरणाच्या साखळीचा तपास पोलीस करीत आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, विकास साळवे, राहुल डोके, भीमराज खर्से, भगवान थोरात, सुनल मालणकर व महादेव भांड आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, सूरज मेढे, संतोष पगारे, रावसाहेब लोखंडे, पोलीस अंमलदार आत्माराम पवार, विजय आगलावे, विशाल कर्पे, ऋतीक बेनके यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘एसआयआर’ आंदोलन म्हणजे विरोधकांची नौटंकी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विरोधकांना निवडणुकीत यश मिळाले नाही, त्याचे खापर आता ‘एसआयआर’वर फोडले जात आहे. या विषयावरून सुरू असलेली आंदोलने म्हणजे केवळ नौटंकी आहे. या...