अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील खरीप कांद्याची काढणी ऑगस्ट अखेरपासून सुरू झाली आहे. आता तेथील बाजारपेठांमध्ये आवक वाढत आहे. नवीन व ताजा कांदा उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी तसेच निर्यातदारांकडून या कांद्याला पसंती मिळत आहे. परिणामी, अहिल्यानगर जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला असून, घाऊक दरात घसरण होत आहे.
कर्नाटकातील बाजारपेठेत कांद्याला 35 ते 51 रुपये किलो दर मिळत असल्यामुळे अहिल्यानगरच्या कांद्याच्या दरावरही त्याचा परिणाम होत आहे. काल राहाता बाजार समिती आवारात कांद्याला क्विंटलमागे 700 ते 4600 रूपयांचा दर मिळाला. गत आठवड्यात या बाजार समितीत 1 नं. कांद्याला 5000 ते 5500 रूपयांचा दर मिळत होता. पाथर्डी, जामखेडमध्ये 1000 ते 4100 रूपये, संगमनेरात 1000 ते 5000 रूपये, कोपरगावात 1000 ते 4100 रूपये, नेवासा 1000 ते 3955 रूपये दर मिळाला. या सर्व बाजार समित्यांमध्ये गत आठवड्यात 5000 रूपयांच्या वरच दर मिळत होता.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यासह लासलगाव बाजार समित्यामधील चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक दर गेल्या महिन्यातील प्रति क्विंटलमागे 5700 रुपये वरून 4600 रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या तीन दिवसात कमाल दरात सुमारे 600 रुपये घाऊक बाजारातील दर घसरले असतानाही शहरी किरकोळ बाजारात ग्राहकांना 55-65 रुपये किलो मोजावे लागत आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवक वाढत असल्यामुळे राज्यातील कांदा बाजारावर दबाव निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. खरीप कांद्याची आवक विविध राज्यांत वाढती असली, तरी उत्पादनावर हवामानाचा परिणाम झाला आहे. आगामी काळात आवक, निर्यात आणि देशांतर्गत मागणी यावर कांद्याच्या दराचे गणित अवलंबून राहणार आहे दिवाळीपर्यंत बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.




