
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत भगवानगडाच्या शेतजमिनीला लागून असलेली विहीर सध्या परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव, बंधारे तसेच अनेक विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असताना या विहिरीतील पाणीसाठा मात्र कायम राहून उलट वाढत असल्याचे परिसरातील शेतकर्यांचे म्हणणे आहे.
भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर गडावर अखंड अन्नदान सुरू असून भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासह गोशाळेतील गोधनासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. या सर्व कामांसाठी याच विहिरीतील पाण्याचा वापर केला जात आहे. सातत्याने पाण्याचा उपसा होत असतानाही विहिरीतील पाणीपातळी कमी न होता टिकून असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या विहिरीतील पाणीसाठा वाढल्याची माहिती सोशल मीडियावरून तसेच परिसरात पसरल्यानंतर अनेक नागरिक व भाविकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दररोज मोठ्या संख्येने नागरिक विहीर पाहण्यासाठी येत आहेत. भगवानगडाचे संत भगवानबाबांशी असलेले आध्यात्मिक नाते सर्वश्रुत आहे. संत भगवानबाबांनी पाण्यावर गाथा वाचन केल्याची परंपराही सांगितली जाते. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थितीतही भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या या विहिरीत मुबलक पाणी टिकून राहणे ही संत भगवानबाबांची कृपा आणि निसर्गाची साथ असल्याची भावना अनेक भाविक व्यक्त करीत आहेत.
अवघ्या दीडशे फुटांवर दुसरी विहीर कोरडी
विशेष म्हणजे भगवानगडाच्या विहिरीपासून अवघ्या दीडशे फुटांच्या अंतरावर नागलवाडी येथील खासगी विहीर आहे. मात्र, या विहिरीतील पाणीसाठा अत्यल्प असून ती जवळपास कोरडी पडली आहे. एकाच परिसरात आणि अवघ्या काही अंतरावर असलेल्या दोन विहिरींच्या पाणीपातळीत एवढी मोठी तफावत असल्याने हा विषय नागरिकांच्या कुतूहलाचा ठरला आहे.
जलस्रोताचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज
या विहिरीला पाण्याचा नैसर्गिक स्रोत नेमका कोणता आहे, याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होण्याची गरज आहे. भूजलतज्ज्ञांकडून पाहणी करून विहिरीतील पाणीपातळी कायम राहण्यामागील नेमके कारण शोधल्यास या जलस्रोताचे महत्त्व स्पष्ट होऊ शकते. दुष्काळसदृश्य परिस्थितीतही पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने या विहिरीचा अभ्यास भविष्यातील जलव्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरू शकतो.




