अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या ई-श्रम पोर्टलवर जिल्ह्यातील 55 हजार 910 असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, यापैकी 16 हजार 130 कामगारांचा शोध लागत नसल्याने जिल्हा पुरवठा विभागाला रेशन कार्ड वाटपात अडसर येत आहे. एका प्रकारे या ई-श्रम पोर्टलवरून असंघटीत कामगार बेपत्ता झाल्याने पुरवठा विभाग मात्र परेशान झाला आहे.
ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांसाठी एक केंद्रीयकृत डेटाबेस आहे. या पोर्टलवर नोंदणी करून असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केले आहे. ई-श्रम पोर्टलवर जिल्ह्यातील 55 हजार 910 स्थलांतरित व असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे. पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या कामगारांपैकी अनेक कामगारांकडे शिधापत्रिका नाहीत. अशा कामगारांना प्रशासनाकडून शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.
या नोंदणीकृत असलेल्या 55 हजार 919 कामगारांपैकी 39 हजार 780 कामगारांशी जिल्हा पुरवठा विभागाने संपर्क केला आहे. यातील 23 हजार 814 कामगारांकडे शिधापत्रिका आढळून आल्या होत्या. तर 483 नोंदणीकृत कामगारांना प्रशासनाकडून शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच 16 हजार 130 कामगारांचा माहिती मिळत नसल्याने शिधापत्रिका वाटप रखडले आहे.
लहान आणि सीमांत शेतकरी, शेतमजूर, पशुपालन करणारे, सेल्समन, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, किराणा, बेकरी, पानपट्टी, इत्यादी सर्व दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार, आशा वर्कर, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्र संचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खासगी क्लासेस संचालक, विडी कामगार यांचा यात समावेश आहे. मात्र, पोर्टलवरील 16 हजार कामगारांचा संपर्क होत नसल्याने पुरवठा विभाग बेजार झाला आहे.
ई-श्रम नोंदणीकृत कामगारांसाठी शिधापत्रिका
स्थलांतरित, असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, पण शिधापत्रिका मिळाली नाही. त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. अशा लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अर्ज केल्यास शिधापत्रिका देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली.