नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janta Party) नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले आणि थेट शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना राजीनामा द्यावा लागला यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने आपले आंदोलन मागे घेतले असले तरी आता सोशल मिडियावर E20 जनता पार्टी या नव्या पार्टीचा जन्म झाला आहे. E20 जनता पार्टी असे या पार्टीचे नाव आहे. हा कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा संघटना नसून, E20 पेट्रोलविरोधात सुरू करण्यात आलेले सोशल मीडिया अभियान असल्याचा दावा संबंधित हँडलकडून करण्यात आला आहे.
E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत १००% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे, सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, त्यांची सब्सिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा. ही त्यांची मागणी आहे.. या पक्षाच्या सोशल मीडीया अँकाऊंटचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत.
काय आहे E20 जनता पार्टी?
‘E20 जनता पार्टी’ हा कोणताही अधिकृत राजकीय पक्ष किंवा नोंदणीकृत संघटना नाही. ‘X’ आणि इन्स्टाग्रामवर सुरू करण्यात आलेले हे एक डिजिटल अभियान आहे. या अभियानाशी संबंधित हँडल स्वतःला सर्वसामान्य वाहनचालकांचा आवाज असल्याचे सांगत आहे.
या अभियानामागील लोकांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकार E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलला प्रोत्साहन देत असेल तर त्यास हरकत नाही; मात्र ग्राहकांना 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल खरेदी करण्याचा पर्यायही पेट्रोल पंपांवर उपलब्ध असावा. कोणते इंधन वापरायचे, याचा निर्णय ग्राहकांनी स्वतः घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा
E20 जनता पार्टीच्या काय मागण्या आहेत?
या डिजिटल मोहिमेची मुख्य मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबतच 100 टक्के इथेनॉलमुक्त पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे.
वाहन उत्पादकांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे.
सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत.
ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे.
आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत; त्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करू नयेत.
E20 चा राजकीय पक्षाशी काय संबंध?
E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे की, हे एक स्वतंत्र नागरिक अभियान आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट संबंधित प्रश्न मांडणे, पारदर्शकता सुनिश्चित करणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि भारताच्या E20 धोरणावर खुली व निष्पक्ष सार्वजनिक चर्चा घडवून आणणे, हाच या अभियानाचा उद्देश आहे. यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की, आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि आम्ही कोणत्याही राजकीय विचारसरणीचा प्रचार करत नाही. आम्ही फक्त नागरिकांच्या हक्कांच्या बाजूने उभे आहोत.
कॉकरोच जनता पार्टीशी तुलना
सोशल मीडियावर अनेकजण या मोहिमेची तुलना कॉकरोच जनता पार्टी (CJP) शी करत आहेत. कारण CJP ची सुरुवातही सोशल मीडियावरील व्यंगात्मक (Satirical) मोहिम म्हणून झाली होती. त्यानंतर NEET पेपर लीक प्रकरणात ती मोठ्या आंदोलनात परिवर्तित झाली होती.मात्र, E20 जनता पार्टी आणि CJP यांच्यात अधिकृत संबंध असल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दोन्ही मोहिमांची तुलना प्रामुख्याने सोशल मीडियावरील चर्चांच्या आधारावर केली जात आहे.




