अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मंगळवारी रात्री श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव तालुक्यात सौम्य धक्के जाणवले होते. ते धक्के भुकंपाचे असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान यासंदर्भात बुधवारी जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत भूकंपमापन केंद्र, मेरी, नाशिक येथील अधिकार्यांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता भूकंपाबाबत अफवा पसरवू नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहरातील ऐनतपूर परिसर, इंदिरानगर, बेलापूर, उक्कलगाव, एकलहरे, टिळकनगर, रांजणखोल, राहुरी शहर परिसर तसेच राहाता, कोपरगाव तालुक्यातील काही गावांत मंगळवारी रात्री नऊ ते पावणे दहा वाजेच्या दरम्यान अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या, दरवाजे व छताचे पत्रे थरथरले. त्यामुळे भुकंप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. बुधवारी दिवसभर ही चर्चा सुरू होती. याबाबत जिल्हा प्रशासनाने खुलासा करून सदरचे धक्के भुकंपाचे नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान हे धक्के के. के. रेंजमध्ये लष्कराचा सराव सुरू असल्याने त्याची कंपनं जाणवल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. भूकंपाची पूर्वसूचना मिळत नाही, त्यामुळे भूकंपाचा धक्का कधीही बसू शकतो असे गृहीत धरून सतत दक्षता घेण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
मंगळवारी रात्री जाणवलेले धक्के भूकंपाचे नाही. के. के. रेंजमध्ये लष्करातील जवानांसाठी प्रशिक्षण सुरू आहे. तेथील अधिकार्यांशी माझे बोलणे झाले आहे. प्रशिक्षण सुरू असल्याने तोफांचे स्फोट होऊन जमिनीला हादरा बसतो, यामुळे सौम्य धक्के जाणवतात.
– डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी