नाशिक | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. हे भूकंपाचे धक्के ४.३ रिश्टर स्केल असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान दिंडोरी तालुक्यात भनवड हे केंद्र बिंदू आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने घबराट पसरली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात गेले काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवत होते. आजही नाशिक जिल्ह्यातील शहरी भागातही भूकंपाचा धक्का जाणवल्याने घबराट पसरली आहे. गेले काही दिवस ग्रामीण भागात जाणवलेले धक्के आता शहरी भागातही जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
भूकंपाचा धक्का जाणवताच म्हसरूळ, बोरगड, आनंदवल्ली यासह नाशिक शहरातील विविध भागांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातील वस्तू, खिडक्या व दरवाजे हलल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी घाबरलेले नागरिक तातडीने घराबाहेर पडले.धक्का जाणवल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना फोन करून माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांत फोनाफोनी सुरू होती. सोशल मीडियावरही भूकंपाच्या धक्क्याची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची मॅग्निट्यूड ४.३, वेळ २२:००:५९ IST, खोली ५ किमी आणि प्रदेश नाशिक, महाराष्ट्र असा तपशील दिला आहे.
दिंडोरी तालुक्याला भूकंपाचा मोठा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संपूर्णदिंडोरी तालुक्यात आज रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक भूकंपाचे मोठा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. काही सेकंद चाललेल्या या हादऱ्यांमुळे घरांमधील भांडी, खिडक्या आणि वस्तू हलल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
आज रात्री अचानक जमिनीतून गूढ आवाज आला आणि पाठोपाठ सौम्य धक्का जाणवला. दिंडोरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांतही हा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे भीतीपोटी नागरिक, महिला व लहान मुलांनी रस्त्यावर आणि मोकळ्या जागेत गर्दी केली होती.
प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच स्थानिक महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आव्हान दिंडोरी पेठचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे व दिंडोरी चे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.




