जालना | Jalana
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस असून सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्या असल्या तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र निघणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, जरांगे पाटलांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला असून मराठा बांधवांना मुंबईला जाण्यासाठी तयार राहा असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये दुपारी १२ वाजता बैठक ठेवली आहे. या बैठकीला वेळात वेळ काढून यावे असे देखील त्यांनी सर्वांना सांगितले.
उद्या १२ सप्टेंबर रोजी १२ वाजता महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शक्यतो प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित रहावे, कोणीही हायगाय करू नका. आता अटीतटीचा सामना आहे, घरी बसून टीव्हीवर बैठक पाहण्याचे दिवस नाहीत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. समाजाच्या लेकराची लढाई अंतिम टप्यात आलेली आहे, शक्यतो ज्याला ज्याला शक्य आहे त्याने उद्या बैठकीला हजर रहावे, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले, ‘सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपल्याला मुंबईला जाणचं आहे. मुंबईला जाणाऱ्या वाटेवर येऊन थांबा. जो मार्ग ठरेल त्याच मार्गाने मुंबईला जायचं. ज्यांना पैशाच्या अडचणी असतील त्यांनी येऊ नका त्यांनी आम्हाला शांततेत गावातच पाठिंबा द्यावा. समाजाची हार होऊ देऊ नका. मुंबईत येऊ शकत नाही त्यांनी इथूनच पाठिंबा द्या.’
एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे
मुद्दा पाऊस नाही, अडीअडचणी आहेत, त्यामुळे महिलांनी येऊ नका. गाव सांभाळले तरी खूप झाले, आरक्षणाचे आणि शेतीचे पण संकट आहे. सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्या लावायच्या. एका तालुक्यात आपण लाखा पेक्षा कमी नाहीत, असे म्हणत जरांगे पाटलांनी आता मुंबईला जाण्याचा निर्धार केला असून सरकारला थेट इशाराच दिलाय. ज्यादिवशी तारीख ठरेल त्या दिवशी काम सोडून रस्त्यावर या. मुंबईत आम्हाला त्रास झाला तर जागोजाग रस्ते अडवून ठेवा, सणावारचे दिवस आहेत, आपला जाण्याचं त्याच वेळेत ठरणार आहे. मागच्या वेळी परवानगी नाकारली, यावेळी ते नाकारणार नाहीत. परवानगी दिली आणि नाही दिली तरी मुंबईला जाणार असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला. तसेच, न्याय देवता गोरगरिबांच्या लेकरावर अन्याय करत नाही, असेही त्यांनी म्हटले.




