अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेले एकनाथ घोगरे यांनी या निर्णयाला नाशिक येथील सह निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे अपील दाखल करून आव्हान दिले आहे. या अपिलावर बुधवारी (14 ऑक्टोबर) सह निबंधक संभाजी निकम यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांनी निकाल राखून ठेवला असून, आज (गुरूवारी) निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती घोगरे यांच्यावतीने बाजू मांडणारे अॅड. सुरेश लगड यांनी दिली.
राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात एकनाथ घोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सूचकाने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितल्याने जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी घोगरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरोधात नाशिक येथील सह निबंधकांकडे अपील दाखल केले. या अपिलावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान घोगरे यांच्यावतीने अॅड. लगड यांनी युक्तिवाद केला.
उमेदवारी अर्जावरील सूचकाची स्वाक्षरी स्वतःची नसल्याचे सूचकाने मान्य केले असले, तरी त्यासंदर्भात त्याने संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असा मुद्दा अॅड. लगड यांनी मांडला. तसेच, उमेदवारी अर्ज बाद करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अर्जावरील सूचकाच्या स्वाक्षरीची संक्षिप्त तपासणी करणे आवश्यक होते; मात्र, तशी तपासणी करण्यात आली नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या बाबींचा विचार करून घोगरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय रद्द करावा आणि त्यांचा अर्ज वैध ठरवावा, अशी मागणी अॅड. लगड यांनी सह निबंधकांसमोर केली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपले म्हणणे ई-मेलव्दारे सादर केले. मात्र, ते स्वतः सुनावणीसाठी उपस्थित नव्हते, असे अॅड. लगड यांनी सांगितले. आता सह निबंधक निकम यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.




