Friday, September 20, 2024
Homeजळगावआता भाजपामध्ये राहणे उचित…; भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान

आता भाजपामध्ये राहणे उचित…; भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान

जळगाव | Jalgaon
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याची घोषणा लोकसभेच्या तोंडावर केली होती. मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही, दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच फोटो दिसत होते. त्यामुळे नाथाभाऊ नेमके कोणाचे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

यावर एकनाथ खडसे यांनी आज भाष्य केले आहे. भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

आता भाजपमध्ये जाणे उचित नाही
भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आता भाजपामध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये शुभेच्छांचे बॅनर झळकावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे नाथाभाऊ नेमके भाजपचे की राष्ट्रवादीचे? असा सवाल उपस्थित होता. अशातच आता एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या