मुंबई । Mumbai
एकनाथ खडसे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल रात्री सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरु आहे. बैठकीवेळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर खुद्द एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात निवेदन मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यात सहकारी सूतगिरणी, मुक्ताबाई मंदिराचे विकास काम, अल्पसंख्यांकांचा इंजिनिअरिंग कॉलेज यांसह अनेक विषयांचा समावेश असलेले निवेदन मी त्यांना दिले. या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचे त्यांनी म्हटले.
ही भेट पूर्वनियोजित होती की तुम्ही अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली? याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की, ही पूर्वनियोजित भेट होती. त्यांना मी आधी वेळ मागितली होती. त्यांनी मला वेळ दिल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस यांच्या सोबत झालेल्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? तुम्ही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहात का? असे विचारले असता एकनाथ कसे म्हणाले की, कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. विकास कामांच्या पलीकडे कुठल्याही विषयाची चर्चा झालेली नाही. भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही विचार नाही किंवा त्या संदर्भात राजकीय चर्चा देखील झालेली नाही. भाजपच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत, त्या सर्व अफवा, निरर्थक आहेत असे म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.