नवी दिल्ली । New Delhi
महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. आज (मंगळवार) शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या भेटीत आगामी निवडणुकांसाठीचे जागावाटप आणि महायुतीमधील मित्रपक्षांमधील समन्वय यावर महत्त्वपूर्ण खलबतं होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठल्यामुळे या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्याच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची भूमिका नेमकी काय असावी, याबद्दल त्यांनी खासदारांना सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आणि पुरवठा साखळीतील अडथळे यावर केंद्र सरकारच्या उपाययोजनांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. तसेच, विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घ्यावी, असे आदेश त्यांनी खासदारांना दिले.
राजकीय भेटीगाठींशिवाय, एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचाही आढावा घेणार आहेत. या संदर्भात ते दिल्लीतील ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करून पुढील न्यायालयीन रणनीती निश्चित करतील. मुंबईतील महत्त्वाचे अधिवेशन सोडून ते दिल्लीला रवाना झाल्याने, मंत्रिमंडळ विस्ताराचा रखडलेला प्रश्न आणि जागावाटपाचा तिढा सोडवणे हेच या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे एक विशेष ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करण्याची शक्यता आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये अनेक मतदारसंघांत मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला, असा दावा करणारा अंतर्गत अहवाल पक्षाने तयार केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि मित्रपक्षांकडून अधिक सक्रिय सहकार्य मिळवण्यासाठी शिंदे भाजप नेतृत्वाकडे आग्रही राहू शकतात.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या तिकीट वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, दुसरीकडे महायुतीचे दोन्ही बडे नेते दिल्लीत ठाण मांडून असल्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मोठे बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत.





