मुंबई । Mumbai
आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या. देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल.
१२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.