Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा…"; एकनाथ शिंदेंनी खासदारांचे कान टोचले

“आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा…”; एकनाथ शिंदेंनी खासदारांचे कान टोचले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अचानक दिल्लीला जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची भेट ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्या घडामोडी सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे हे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटायला गेल्यानंतर या दौऱ्यातील आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीबद्दल शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. या फेरबदलात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांची धडपड सुरु आहे. या खासदारांची एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केल्याचे समजते. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असे शिंदेंनी या खासदारांना सुनावले.

- Advertisement -

पडसाद : शिक्षण क्षेत्रातील रक्तपिपासू जळवा

आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा
तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या कामाच विश्लेषण होत आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचं प्रतिनिधित्व सभागृहात दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, तेच सर्वांना लागू होणार, असे एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या बैठकीत सांगितले.

एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इराण इस्रायल युद्धाबाबत चर्चा केली. देशातील सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये जे भारतीय अडकले होते, त्यांना आणण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदींना सांगितले की, अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणने होर्मुझमधून दोन जहाजे आली आहेत. यावरही चर्चा झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

राहुल शेवाळे प्रचंड नाराज
शिवसेना खासदार राहुल शेवाळे सध्या प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल शेवाळे हे पक्षात दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून राहुल शेवाळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री उदय सामंत हे राहुल शेवाळे यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत आल्यानंतर राहुल शेवाळ हे श्रीकांत शिंदे यांना भेटले. या भेटीत शेवाळे यांची नाराजी दूर झाली का नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

ताज्या बातम्या