नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
शिक्षण क्षेत्र किती व कसे बरबटलेले आहे, याची अत्यंत भयावह माहिती गेल्या काही दिवसांपासून टप्प्याटप्प्याने उघड होत असून गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ताज्या माहितीने हा या क्षेत्रातील ऐतिहासिक महाघोटाळा ठरण्याची शक्यता आहे. शक्यता यासाठी की, यापुढेही असे महा-महाघोटाळे होणारच नाहीत असे नाही. कारण सातत्याने गेल्या दशकभरापासून शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत चाललेला भ्रष्टाचार राजरोस सुरू असतानाही सर्वांनीच डोळे झाकून घेतले होते. आतादेखील कोणाचे तरी दुखले म्हणून ही कारवाई होत आहे. काही जणांना अटकही झालेली आहे. परंतु घोटाळ्याचा आकडा दीडशे कोटींहून अधिक चाललेला पाहून भविष्यात हे सारे साव बनून समाजासमोर आल्यास आश्चर्य वाटू नये.
कारण या प्रकरणात अटक वा कारवाई झालेल्या अनेकांना यापूर्वीही एक-दोनदा नव्हे तर अनेकदा कारवाईस सामोरे जावे लागूनही त्यांच्यात काडीचाही फरक पडलेला नाही. गेंड्याची कातडी पांघरलेली ही शिक्षण क्षेत्रातील कीड समूळ नष्ट करायची असेल तर त्यासाठी सुरुवात मंत्रालयापासूनच करावी लागेल. अनेकांना कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल. पण वारंवार रंगेहाथ सापडूनही काही महाभागांना कारवाईनंतरही जेव्हा बढतीची शाबासकी दिली जाते, तेव्हा हे कुठून व का झाले हे न समजण्याएवढे लोक दूधखुळे नाहीत. त्यामुळेच या दीडशे कोटींच्या महाघोटाळ्यात शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकार्यांसह सुमारे ८४१ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बोगस शालार्थ आयडीचा लाभ घेणार्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर काही शिक्षण संस्था चालकही त्यात आकंठ बुडालेले दिसतात.
थोडक्यात काय, तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारात किती निर्ढावले आहे, याची प्रचिती अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत येत आहे. विदर्भात असंख्य लोक कारवाईच्या कचाट्यात आल्यानंतर इतर ठिकाणीही त्याचीच री ओढली गेली. आता तर नाशिक विभागातही हाच आकडा हजारापर्यंत पोहोचताना दिसत आहे. हे असेच चालू राहिले तर काही दिवसांनी शिक्षण खात्यात माणसंच शिल्लक राहिली नाही तरी आश्चर्य वाटू नये. प्रत्येकालाच भस्म्या रोग जडल्याने खा खा सुटली आहे. फुटकळ कारणांसाठीही हजार-लाखाच्या गोष्टी करणारे शिक्षण खात्यातील लोक म्हणजे रक्तपिपासू जळवा आहेत. पैशाला चटावलेले हे लोक त्या जळवांप्रमाणेच रक्ताचा शेवटचा थेंब शोषल्याशिवाय काढता येत नाही, तद्वतच शिक्षण क्षेत्रातील ही माणसं शेवटची पै मिळेपर्यंत गरजूंना शोषत राहतात. एकीकडे, शालार्थ आयडी घोटाळ्याचा राज्यव्यापी तपास सुरू असतानाच शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचाही विषय ऐरणीवर आला. त्यातील सचिव दर्जाच्या अधिकार्यांना तत्काळ निलंबित केले गेले; परंतु नंतर सरकारने यू टर्नही घेतला. कारण, संबंधित आदेश अधिकारी पातळीवर होत नसावा. त्यातही झारीतील शुक्राचार्य कोण हे जाहीर करण्याची तसदी सरकारने घेतली नाही.
पाठोपाठ नाशिकच्या महात्मा गांधी विद्यामंदिर या जुन्या शैक्षणिक संस्थेच्या शाळांवर प्रशासक नियुक्त केले गेले आहेत. हा आणखी एक वेगळा प्रकार. या कारवाईला, शिक्षणमंत्री दादा भुसे व माजी मंत्री प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबातील स्थानिक राजकारणाचा पदर असल्याचा आरोप केला जात आहे. तो काहीअंशी खरा असला तरी या संस्थेविषयी झालेल्या तक्रारीत सगळेच काही आलबेल नसल्याचे पुढे आले आहेच. संस्थेतच काम करणार्या व एकेकाळी संस्थाचालकांच्या गळ्यातील ताईत असलेल्यानेच हे कांड केले आहे. एकमेकांचे उट्टे काढण्याच्या नादात हा सारा प्रकार घडल्याचे दिसते. हिरे कुटुंबातील कुलदीपक शिवसेनेत गेले आणि त्यांनी संजय राऊतांच्या तोंडून भुसेंवर टीकास्र सोडले. भुसेंनी राऊतांवरच दावा ठोकला. त्याची परिणती राऊतांवर सुनावणीस वारंवार यावे लागले. ज्यांच्यासाठी हे सारे केले ते हिरे कुलदीपक हेच नंतर भाजपमध्ये गेल्याने राऊत तोंडावर पडले आणि त्यांना लगोलग मालेगाव न्यायालयात या आरोपांबद्दल सपशेल माफी मागून आपली सोडवणूक करवून घेतली.
आता वेळ प्रत्यक्ष हिरेंवर आली आहे. हा हिरे व भुसे यांच्यातील व्यक्तिगत सामना असला तरी त्याला नंतर शिवसेना विरुद्ध भाजप असाही एक पदर आहे. हे प्रकरण किती ताणले जाते ते पाहावयाचे. पण शैक्षणिक वर्तुळातील एकूणच भ्रष्टाचाराची अशी वाहती गंगा पाहिल्यावर त्यात हात धुवून घेणारेच अधिक होणार हे ओघाने आलेच. शालार्थ आयडी घोटाळ्यात तर शब्दश: शेकडो लोक गुंतलेले आहेत. पैकी उपसंचालक व शिक्षणाधिकारी पदावर राहिलेले आणि सध्या निवृत्तीचा काळ व्यतीत करणारेही कारवाईच्या कक्षेत आल्याने हे सारे कुठवर जाणार, हा मोठा प्रश्न आहे. शिक्षणासारख्या क्षेत्रात अशी बजबजपुरी माजलेली असताना शिक्षणमंत्री या नात्याने दादा भुसे यांनीही पुढाकार घेऊन व्यक्तिगत रागलोभाच्या पलीकडे जात खात्यात साफसफाई मोहीम हाती घ्यायला हवी. त्यांच्या जिल्ह्यातच एवढी मोठी कारवाई झाल्याने ओघाने त्यांच्याकडेही एक बोट जाणारच. तेव्हा या प्रकरणाशी फटकून राहण्याऐवजी त्यातील सगळ्याच दोषींवर कारवाई होईल, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी.




