Tuesday, April 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: "चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असावे, पण बाप तो...

Eknath Shinde: “चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असावे, पण बाप तो बाप होता है”; मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंना शिंदेंनी सुनावलं

मुंबई | Mumbai
केवळ चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला, सभागृहातील राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मोदींवर टीका करून चर्चेत राहता येते, त्यामुळे ‘बाप तो बाप होता है’ असा टोलाही शिंदेंनी नाना पटोले यांना लगावला. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे नेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, “नाना पटोले ह विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहित आहे. पण ते असे का वागले याची माहिती नाही. त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न पण केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे चर्चेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना दाखवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असावे. त्यांचे नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन मोदींवर टीका करतात. तसेच नाना पटोले यांनी केले. पण बाप तो बाप होता है.”

- Advertisement -

एकच सांगेन की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला मोठी मदत केली आहे. रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला निधी दिला. डबल इंजिन सरकारमुळे विकास होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. सन्मान केला पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले. काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. ‘अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, नाना पटोलेंनी माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर नाना पटोलेंना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्याचे निलंबन अशी भूमिका राज्य सरकार घेत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, “राज्यातील शेतकऱ्यांना आज शुभेच्छा देतो. महायुतीचे सरकार आहे, त्यांची वास्तविकता आज समोर आली. कृषिमंत्री, आमदार हे शेतकऱ्यांना भिकारी समजतात. शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. बोनस देत नाहीत. कर्जमाफी करण्याची भूमिका मांडली होती, पीकविमा बंद केला. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. रोज हा विषय मांडू, आम्हाला निलंबित करायचं असेल तर करा.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...