Thursday, November 12, 2026
Homeक्राईमएकरूखे येथे वृद्धाच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांचा धाडसी दरोडा

एकरूखे येथे वृद्धाच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांचा धाडसी दरोडा

महिला जखमी || दीड लाखांचा ऐवज लांबवला

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

माझ्या बाळाला उलटी झाली आहे, जरा पिण्यासाठी पाणी द्या, असा काकुळतीचा आव आणत दरवाज्यावर आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हाकेवर विश्वास ठेवणे राहाता तालुक्यातील एकरूखे येथील एका गृहिणीला भलतेच महाग पडले आहे. पाणी घेऊन दाराची जाळी उघडताच या वृद्ध भामट्याने त्याच्या साथीदारांसह घरात घुसून चाकूचा धाक दाखवत महिलेला जबर मारहाण केली आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एकरूखे येथील रहिवासी श्रद्धा गौरव बोर्डे (वय 38) या शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरात एकट्याच होत्या. सायंकाळी 7:20 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींवरून चार भामटे त्यांच्या घराच्या गेटसमोर येऊन थांबले. त्यापैकी अंदाजे 65 वर्षे वयाचा, अंगात पांढरा पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि कपाळावर टिळा लावलेला एक इसम गाडीवरून खाली उतरला आणि अत्यंत सभ्य गृहस्थासारखा थेट गेट उघडून आत आला. आपल्या लहान बाळाला उलटी झाल्याचे सांगत त्याने श्रद्धा यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली. समोर गांधी टोपी घातलेला वृद्ध गृहस्थ पाहून श्रद्धा यांनी अजिबात शंका न घेता घरातून पाण्याचा तांब्या आणला. मात्र जशी त्यांनी सुरक्षेच्या जाळीचे दार उघडले, तसा या भामट्याने आपला खरा मुखवटा उघड केला. त्याने क्षणाचाही विलंब न करता खिशातील चमकणारा चाकू काढून श्रद्धा यांच्या मानेला लावला आणि बळजबरीने घरात प्रवेश केला. पाठोपाठ बाहेर दबा धरून बसलेले 30 ते 35 वयोगटातील त्याचे इतर तीन साथीदारही घरात घुसले.

घरात शिरताच या दरोडेखोरांनी श्रद्धा यांना जिवंत मारण्याची धमकी देत ओलीस ठेवले आणि त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी कानातील सोन्याचे टॉप्स इतक्या निर्दयीपणे ओरबाडले की, श्रद्धा यांच्या कानाची पाळी फाटून गळ्यावर आणि गालावर गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रद्धा यांना घाबरवून दरोडेखोरांनी बेडरूममधील कपाटाची उचकापाचक केली आणि तेथून सोन्याची 7 ग्रॅमची साखळी, 4 ग्रॅमचा वेल, 2 ग्रॅमचे ओम पान, 2 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅमचे कानातील टॉप्स, 3 भाराच्या चांदीच्या तोरड्या आणि 6 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 51 हजार 500 रुपयांचा ऐवज अवघ्या काही मिनिटांत लंपास केला.

झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना किंवा कोणाला काही सांगितले तर तुला थेट जिवंत मारून टाकू, अशी धमकी देऊन चौघेही दरोडेखोर आपल्या दुचाकींवर बसून अंधाराचा फायदा घेत सुसाट वेगाने पसार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी सहकार्‍यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी जखमी महिला श्रद्धा बोर्डे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता मधील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धाच्या वेषात येऊन अशा प्रकारे दरोडा टाकणार्‍या या भामट्यांचा सुगावा लावण्यासाठी राहाता पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून सहायक पोलीस निरीक्षक संगीता गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान अनोळखी व्यक्तींना दारातूनच पाणी किंवा मदत देताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...