
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा एल निनो च्या पार्श्वभूमीवर मान्सूनबाबत सुरूवातीपासूनच चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यात असलेली आणि नाशिक-पुण्यात असलेली पण या जिल्ह्याला लाभदायी असलेली जवळपास सर्वच धरणं तुडंब झाली आहेत. एवढेच नव्हेतर जायकवाडी धरणही 93 टक्के झाल्याने नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी सोडण्याचे संकटही टळले आहे.
हवामानातील बदल आणि एल निनो च्या वाढत्या प्रभावामुळे यंदा मान्सूनमध्ये अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. शास्त्रज्ञांनी यंदा सुपर एल निनोचा इशारा दिल्यामुळे कमी पाऊस, दुष्काळाची टांगती तलवार आणि लांबणारा मान्सून या आव्हानांचा सामना करावा लागणार होता. हे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन सरकारही या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. जूनच्या सुरूवातीला पावसाने विलंब केला. त्यात सर्वच धरणांचे पोट खपाटीला गेले होते. परिणामी राहिलेले पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते.
एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने यंदा पाऊस कमी कोसळणार असा अंदाजही व्यक्त होते. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिकांसह नगरकर चिंतेंत होते. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. वरूणराजाने मेहरबानी केली नी जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा, निळवंडे, आढळा, आंबित, वाकी, पिंपळगाव खांड, नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, पुण्यातील डिंभे, वडज, घोड यासह अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली. मुळा धरणातील पाणीसाठा 83 टक्के पाणीसाठा झाला आहे. गोदावरी, प्रवरा, मुळा, आढळा, म्हाळुंगी यासह अन्य नद्याही भरूभरून वाहू लागल्या. धरणं भरली पण समन्यायी कायद्यामुळे जायकवाडीत 65 टक्के उपयुक्त पाणीसाठा होणे गरजेचे होते. आता तोही साठा 93 टक्क्यांवर गेल्याने या धरणाचेही 18 दरावाजे उघडण्यात येऊन पाणी सोडण्यात येत आहे.




