Thursday, July 23, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon 2026 : यंदाच्या मान्सूनवर 'अल निनो'चे सावट? पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा...

Monsoon 2026 : यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चे सावट? पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज

मुंबई । Mumbai

भारत हा एक कृषीप्रधान देश असून येथील मोठी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. मात्र, भारतीय शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर आधारलेली असल्याने निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरतो. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते, तर कधी दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडतो. अशातच, जागतिक हवामान संघटनेने (WMO) यंदाच्या मान्सूनबाबत आपला पहिला अंदाज वर्तवला असून, यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

- Advertisement -

जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, यंदा भारतामध्ये मान्सूनवर ‘अल निनो’चा (El Nino) मोठा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला, तर यावर्षी देशात पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. गेल्या वर्षी देशाच्या अनेक भागांत, विशेषतः महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वी दाखल झाला होता आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. मात्र, यंदा परिस्थिती नेमकी उलट राहण्याची चिन्हे दिसत असून कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

‘अल निनो’च्या प्रभावामुळे केवळ पावसावरच परिणाम होणार नाही, तर तापमानावरही याचा मोठा परिणाम दिसून येईल. यावर्षी उन्हाचा कडाका अधिक तीव्र राहणार असून तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने वर्तवली आहे. महाराष्ट्रातही याचा परिणाम जाणवणार असून राज्याच्या काही भागांत पावसाचे प्रमाण घटण्याचा अंदाज आहे. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने आणि सिंचनाच्या सोयी मर्यादित असल्याने पावसातील ही घट उत्पादनावर थेट परिणाम करू शकते.

दुसरीकडे, काही स्थानिक हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना धीर दिला आहे. त्यांच्या मते, मान्सूनवर अल निनोचा नेमका किती आणि कसा परिणाम होईल, याबाबत आताच ठाम भाकीत करणे घाईचे ठरू शकते. पावसाची नेमकी स्थिती आणि अल निनोचा प्रभाव यांचे अधिक स्पष्ट चित्र मे महिन्यानंतरच समोर येईल. त्यामुळे सध्या घाबरून जाण्याचे कारण नसले तरी, हवामान बदलाच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

भारतातील शेतीसाठी मान्सून हा कणा मानला जातो. जर मान्सूनमध्ये खंड पडला किंवा पावसाचे प्रमाण कमी झाले, तर त्याचा परिणाम केवळ अन्नधान्य उत्पादनावरच नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या सुधारित अंदाजाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या वर्षी पावसावर अल निनोचे सावट राहणार हे स्पष्ट असले तरी, मान्सूनच्या प्रत्यक्ष आगमनानंतरच परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

default-featured-image

Trimbakeshwar Rain News : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्यासह पाऊस; घराचे पत्रे उडून...

0
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City) ग्रामीण भागात बुधवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून,...