Thursday, September 10, 2026
Homeक्राईमParner : वृद्धेचे मंगळसूत्र लांबविणार्‍या दोन महिलांना अटक

Parner : वृद्धेचे मंगळसूत्र लांबविणार्‍या दोन महिलांना अटक

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

टाकळी ढोकेश्वर बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत 70 वर्षीय वृद्धेचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविणार्‍या दोन महिलांना पारनेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची चारचाकी जप्त करण्यात आली असून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

- Advertisement -

सिताबाई मंजाबा खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) दुपारी साडेएकच्या सुमारास त्या टाकळी ढोकेश्वर बसस्थानकावर पाथर्डी-विठ्ठलवाडी बसमध्ये चढत असताना दोन-तीन महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात 4 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी तत्काळ गुन्हे शोध पथक रवाना करून गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींचा शोध घेतला.

त्यातून लिलाबाई भोलेनाथ खंदारे, शोभा सुरेश खंदारे व शोभा प्रताप खंदारे (नजरेआड), तिघी रा. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, यांनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लिलाबाई खंदारे व शोभा सुरेश खंदारे यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान त्यांनी घारगाव पोलिस ठाणे व कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल धामणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण लगड, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनिषा कडुस, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल सारंग वाघ, पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे, दक्षिण विभाग मोबाइल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु व अरुण सांगळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पोपट रोकडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...