मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) निकालानंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून ईव्हीएमबाबत (EVM) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महायुतीला (Mahayuti) मिळालेले यश हे जनादेश नसून ईव्हीएमची कमाल असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज एक पत्रक काढत महत्त्वाची माहिती दिली आहे. निवडणूक निकालाच्या १७ दिवसांनंतर १४४० व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी पूर्ण झालेली असून ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी
निवडणूक निकालानंतर राज्यातील अनेक विजयी आणि पराभूत उमेदवारांनी व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला होता. या प्रक्रियेसाठी लागणारी रक्कमही उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लीप्सची मोजणी पूर्ण केली आहे.त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik News : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त होणार?
निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्टीकरण देतांना म्हटले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पध्दतीने निवडलेल्या ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १ हजार ४४० व्हीव्हीपॅट मधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली आहे, असे सांगितले.
हे देखील वाचा : Nashik News : लासलगाव पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारी जनावरे जप्त
तसेच मतमोजणीच्या (Counting of Votes) दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असा अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे ३६ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : २१७ हेक्टर द्राक्षबागा अवकाळीग्रस्त
पुढे निवडणूक आयोगाने म्हटले की, “ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे. मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या ५ मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे,” अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.