अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
14 वा वित्त आयोग व नाविण्यपूर्ण योजनेतून घेतलेल्या ई- कचरा संकलन घंटागाड्या एका जागेवर उभ्या ठेवू नका. त्या नादुरूस्त असतील तर दुरूस्त करून घ्या. या गाड्याचे लॉकबुक नियमित भरू ते पूर्ण करून ठेवा. या गाड्यांच्या माध्यमातून गावात नियमित कचरा संकलन सुरू ठेवा, अन्यथा संबंधित ग्रामपंचायतीवर कडक कारवाई करण्याचा इशारा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी नाविन्यपूर्ण योजना आणि 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून घेण्यात आलेल्या ई- कचरा संकलन घंटा गाड्यांची दुरवस्था, त्यांचा वापरासाठी आवश्यक मनुष्यबळ, गाड्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च आदी प्रश्नावर छापलेल्या ‘सार्वमत’च्या वृत्ताची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी बुधवार (दि. 12) जिल्ह्यातील ग्रामसेवकांची ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी प्रत्येक पंचायत समितीतून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक या बैठकीला हजर होते. बैठकीत जिल्ह्यातील कचरा संकलन करण्यासाठी घेतलेल्या ई- घंटागाड्यांच्या विषयावर चर्चा झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून वितरित करण्यात आलेल्या घंटागाड्या काही ग्रामपंचायतीमध्ये नादुरूस्त व वापरात नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नादुरूस्त घंटागाड्या तात्काळ दुरूस्त करून वापरात आणण्याचे निर्देश यावेळी दिले. जिल्हा परिषदेचे खातेप्रमुखांनी त्यांच्या दर आठवड्याला होणार्या तालुका भेटीदरम्यान नादुरूस्त आढळून येणार्या घंटागाड्या किंवा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवक यांनी यात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून आल्यास संबंधितावर कारवाई प्रस्तावित करावी.
तसेच 15 वा वित्त आयोग अंतर्गत निधी शिल्लक असून कमी खर्च असणार्या ग्रामपंचायतींना हा निधी नियोजन करून खर्च करण्यास फेब्रुवारी महिना अखेरची मुदत देण्यात आली आहे. वित्त आयोगांतर्गत नियोजित विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याबाबत ग्रामसेवक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी वसूली मार्चअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना गटविकास अधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. बैठकीस ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख उपस्थित होते.