अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महावितरणची फसवणूक करून मागील सात महिन्यांत 57 हजार 392 युनिट विजेची चोरी करत 12 लाख 43 हजार 730 रूपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तुलसी बायो एनर्जी या आस्थापनेच्या मालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी (27 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत पुरूषोत्तम पटेल असे संबंधित मालकाचे नाव असून, भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी महावितरणच्या वागळे इस्टेट विभागीय भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता अमूल सुरेश डोमाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील दौंड रोडवरील सुभद्रा नगर परिसरात सर्वे क्रमांक 127/1 येथे तुलसी बायो एनर्जी ही आस्थापना आहे. या ठिकाणी 28 सप्टेंबर 2026 रोजी वीजचोरी झाल्याची बाब फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार, संबंधित वीजवापरदाराने मागील सात महिन्यांच्या कालावधीत एकूण 57 हजार 392 युनिट विजेची चोरी केली. या वीजचोरीमुळे महावितरणचे 12 लाख 43 हजार 730 रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधितांना वीजचोरीचे बिलही देण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, संबंधित वीजवापरदाराने महावितरणच्या वीजबिलाचा भरणा केला नसल्याने शेवटी मंगळवारी (27 ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




