अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील 9 हजार 589 कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत जवळपास 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक भरून नोंदणी केलेली आहे. यात नगर जिल्ह्यातील 454 कनिष्ठ महाविद्यालयात 54 हजार विद्यार्थ्यांनी 11 प्रवेशासाठी भाग 1 नुसान नोंदणी केलेली आहे. आज सोमवारपासून (दि.11) पासून अकरावी प्रवेशाचा पुढील टप्पा सुरू होणार आहे.
दरम्यान, अकरावीच्या प्रवेशाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 14 आणि 15 मे दरम्यान, तर अंतिम गुणवत्ता यादी 18 आणि 19 मे दरम्यान जाहीर होणार आहे. तर पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ यादीही 26 मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने मागील आठवड्यात शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल हाती आल्याने विद्यार्थी व पालक आता अकरावी प्रवेशाची धडपड करणार आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागानेही शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती दिली असून, सोमवार (दि. 11) पासून https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरून नोंदणी करता येणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा महिनाभरापूर्वीच अर्थात 10 एप्रिल 2026 पासून उपलब्ध करून दिली होती. यात आतापर्यंत 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन नोंदणी केलेली आहे. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग-1 आणि भाग-2 भरुन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेर्या होतील. चौथी फेरी ओपन टू ऑल असेल. मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहनही केले आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलेले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात 454 कनिष्ठ महाविद्यालयात 54 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने भाग 1 नूसान नोंदणी केलेली आहे. आता दहावीचा निकाल जाहीर झालेला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसह अन्य कागदपत्रे उपलब्ध झालेली असून भाग 1 नूसार नोंदणी केलेल्या कागदपत्रांसह भाग 2 नूसार तर ज्यांनी भाग 1 नूसान नोंदणी केलेली नाही. अशांना भाग 1 नूसार प्रवेशासाठी नोंदणी करत येणार असल्याचे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
..असा असेल शून्य फेरीचा कार्यक्रम
11 ते 13 मे : शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे. विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 (कोटा) साठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. (व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंड) तसेच विद्यार्थी किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्ये भरू शकतो. 14 व 15 मे : तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. 16 मे : तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती / दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉगिनमधील Grievance Redressal द्वारे सादर करणे, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती / दुरुस्ती मागण्यांचे ऑनलाइन निवारण, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम करणे. दि. 18 व 19 मे : सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे (एकदाच होणारी प्रक्रिया). व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंड वाटप. 19 मे : अल्पसंख्याक, कोटा, इन-हाऊस व व्यवस्थापन कोट्यासाठी झिरो राउंड प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय यादी विभागाकडून दिली जाईल. रिक्त जागा प्रत्यार्पित करणे. 20 मे : रिक्त जागा प्रदर्शित करणे, पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करणे (कोटा जागांसह).
पहिली नियमित कॅप फेरी
– नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाचा भाग एक आणि दोन भरणे, महाविद्यालयांचा प्राध्यान्यक्रम नोंदविणे : 21 आणि 22 मे
– अलॉटमेंट प्रक्रिया : 23 ते 26 मे
– पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ जाहीर करणे : 26 मे.
– वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदत, प्रवेश नकारणे, प्रवेश रद्द करणे : 26 ते 28 मे.
– रिक्त जागांचा तपशील प्रदर्शित करणे : 29 मे.
– दुसर्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे : 30 मे




