Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशYahya Sinwar : इस्रायलने सर्वात मोठ्या शत्रूला उडवलं, घेतला एक वर्षापूर्वीचा बदला…...

Yahya Sinwar : इस्रायलने सर्वात मोठ्या शत्रूला उडवलं, घेतला एक वर्षापूर्वीचा बदला… इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार?

नवी दिल्ली | New Delhi

हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे जवळपास वर्षभरापासून मध्यपूर्व आशियातील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. इस्रायल आणि हमासपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसून, त्यांच्या एकमेकांवर कुरघोड्या सुरूच आहेत.

- Advertisement -

इस्रायली लष्कराने गुरुवारी (18 ऑक्टोबर) हमास प्रमुख याह्या सिनवार (Yahya Sinwar) याचा खात्मा केला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची लष्करी सेना आयडीएफने दिली आहे. तसंच, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही याबाबत दुजोरा दिला आहे.

गुरुवारीही दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात तीन दहशतावाद्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यापैकी एक याह्या सिनवार होता. इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर तीन दहशतवादी ठार केल्याची माहिती सुरुवातीला दिली होती. परंतु, यात याह्या सिनवार मारला गेला की नाही, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नव्हती.

याह्या सिनवार हा ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. इस्रायलने इराणमध्ये बॉम्बस्फोटात हमासचा नेता इस्माईल हानिया मारलं तेव्हा सिनवार हमासचा प्रमुख बनला. 1962 मध्ये गाझा येथील एका निर्वासित छावणीत त्याचा जन्म झाला होता. तो फार लवकर हमासशी जोडला गेला होता. त्याने हमासच्या सिक्युरिटी विंगचं नेतृत्व केलं होतं. ही विंग इस्रायली खबऱ्यांना नष्ट करण्याचं काम करत होती.

1980 च्या उत्तरार्धात त्याला इस्रायलमध्ये अटक करण्यात आली होती. इस्रायलसोबत काम करणाऱ्या 12 जणांच्या खूनाची कबुली त्याने दिली होती. यानंतर त्याला ‘खान युनिसचा कसाई’ हे नाव पडलं होतं. सिनवारला दोन इस्रायली सैनिकांच्या हत्येसह इतर गुन्ह्यांसाठी चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सिनवारला 2008 मध्ये ब्रेन कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर तो वाचला. 2011 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासने पकडलेल्या सैनिकांच्या बदल्यात 1000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती. त्यामध्ये सिनवारचाही समावेश होता. 2016 मध्ये हमास कमांडर महमूद इश्तावीच्या हत्येमागे सिनवारचा हात होता, असं मानलं जातं.

दरम्यान “याह्या सिनवार याच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेत आता शांतता प्रस्थापित होईल. परंतु गाझामधील युद्ध संपलेलं नाही. ओलिस इस्रायलमध्ये परत येत नाहीत, तोवर युद्ध सुरूच राहील”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या