Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिकला अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा केंद्र सुरु होणार

नाशिकला अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा केंद्र सुरु होणार

देवळाली कॅम्प । वार्ताहर Nashik / Devlali Camp

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यभरात घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र आहे.

- Advertisement -

मात्र महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात येताच खा. हेमंत गोडसे यांनी नाशिक येथे परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी एमपीएससी आयोगाकडे केली होती. खा. गोडसे यांच्या पत्राची गंभीर दखल घेत एका पत्राद्दवारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सकारात्मकता दाखविली आहे. पुढील वर्षापासून नाशिक येथे एमपीएससीच्या अभियांत्रिकी परीक्षा केंद्र सुरु होणार, अशी ग्वाही एमपीएससी आयोगातर्फे पत्राद्वारे खा. हेमंत गोडसे यांना दिली आहे.

गेल्या महिन्याभरात उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या एका शिष्ठमंडळाने खा. गोडसे यांची भेट घेवून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिक येथे परीक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. नाशिक येथे परीक्षा केंद्र सुरु झाले तर उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र गाठण्यासाठी होणारी गैरसोय निश्चितच दूर होणार असल्याची माहिती सांगत कोविड-19 च्या काळात परीक्षेला जाण्यासाठीच्या व्यथा खा. गोडसे यांच्यासमोर कथन केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत, खा. गोडसे यांनी 16 सप्टेंबर रोजी मुंबई येथे जात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांची भेट घेवून नाशिक येथे अभियांत्रिकी परीक्षेसाठी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.

नाशिक येथे परीक्षा केंद्रांला मान्यता मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात गैरसोय दूर होणार असल्याचे महत्त्व खा. गोडसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पटवून दिले होते. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने एमपीएससीतर्फे पुढील वर्षापासून नाशिक येथे अभियांत्रिकी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही एका पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव सुनील अवताडे यांनी खा. गोडसे यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षी 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार्‍या परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असल्यामुळे ऐनवेळी बदल करणे शक्य नाही. यावर्षी मुबंई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या चार ठिकाणी एमपीएससीतर्फे अभियांत्रिकीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र पुढील वर्षापासून (2021) प्रशासकीय बाबींचा साकल्याने विचार करुन नाशिक येथे परीक्षा केंद्र सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून उचित ती कार्यवाही करण्यात येईल, असे पत्राद्वारे अवताडे यांनी खा. गोडसे यांना कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या