अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी केसेस झाल्या, त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यात अहिल्यानगर दहावी आणि बारावीची सहा केंद्र असून राज्यभरातील 242 केंद्रांचा समावेश आहे. दरम्यान, राज्य परीक्षा मंडळाच्या या निर्णयामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली असून परीक्षा केंद्र रद्द केलेल्या भाग अथवा गाव वगळून नव्याने दहावी आणि बारावीसाठी परीक्षा केंद्राला मंजुरीसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्यभरात साधारणत: पाच हजारांवर केंद्रे असतात. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने मागील दोन वर्षांत खूप मोठे बदल केले आहेत. विद्यार्थी व पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबली. तरीदेखील, कॉपी केसेस अपेक्षेप्रमाणे कमी झाल्या नाहीत. आता बोर्डाने एक पाऊल पुढे टाकत तशा केंद्रांची मान्यताच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे चार तर बारावीची दोन परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षा केंद्र रद्द केलेल्यामध्ये बारावीचे फुंदे विद्यालय पाथर्डी आणि खरवंडी कासार येथील केंद्राचा दहावीचे वाळकी आणि रुईछत्तीसी (अहिल्यानगर तालुका), ढोरजळगाव (शेवगाव) आणि घारगाव (संगमनेर) येथील चार केंद्राचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, जिल्ह्यात आता दहावीसाठी चार व बारावीसाठी दोन अशा सहा ठिकाणी नव्याने परीक्षा केंद्राचा प्रस्ताव तयार करून तो मान्यतेसाठी परीक्षा परिषदेला पाठवावा लागणार आहे. परीक्षा परिषदेकडून मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी नव्याने केंद्र होणार आहे.
एकामुळे सर्वांची फरफट
दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर एक कॉपी झाली तरी त्या ठिकाणी संपूर्ण केंद्राची मान्यता रद्द करण्याचा निर्णय परीक्षा केंद्रांने घेतल्याने एका विद्यार्थ्यामुळे प्रत्येक केंद्रावरील विद्यार्थ्यांची फरफट होणार आहे. कारण संबंधीत गावातील परीक्षा केंद्र हे शेजारील गावात हलवण्यात येणार असल्याने ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची ओढाताण होणार आहे.
नवीन केंद्रावर हव्यात या सुविधा
जिल्ह्यात नव्याने सुरू करण्यात येणार्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, पक्की इमारत, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, पक्के वॉल कंपाउंड असल्याचे फोटो (लोकेशनसह) पाठवावेत, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. 10 डिसेंबरपूर्वी बोर्डाचे अध्यक्ष, सचिव व सर्व विभागीय अध्यक्षांची बैठक होईल. त्यानुसार परीक्षा केंद्रांची निश्चिती होणार असल्याचे बोर्डाच्या अधिकार्यांनी सांगितले.




