मुंबई | Mumbai
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या कार्यपद्धतीविरोधात विभागातील २९ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. या पत्रामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, विभागातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. तक्रार करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील असल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली. मुंढेविरोधातील तक्रारीचे निवेदन १५ जुलै रोजी पाठवण्यात आले.
पत्रात नमूद केल्यानुसार, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंढेंनी प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. सकाळी ९ ते रात्री १२ अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी तसेच विभागात सकारात्मक आणि सुसंवादी वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, तुकाराम मुंडे हे कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही विविध शासकीय विभागांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते. समर्थकांच्या मते त्यांची कार्यशैली कडक असली तरी ती नियमांवर आधारित आहे; तर विरोधकांच्या मते त्याच कार्यशैलीमुळे अधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
या पत्रानंतर राज्य शासनाची भूमिका काय असेल, मंत्री नरहरी झिरवाळ या तक्रारीची चौकशी करतील का आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडून यावर अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




