Thursday, July 23, 2026
HomeनगरShrirampur : बनावट दुधाच्या रॅकेटमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त

Shrirampur : बनावट दुधाच्या रॅकेटमुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

थेट सामान्य नागरिक तसेच आबालवृद्धांच्या जीवनाशी खेळणारे बनावट दूध रॅकेट तितक्याच ताकदीने जिल्ह्यामध्ये सुरू आहे. प्रशासनाच्या थातूर-मातूर कारवाईनंतर काही दिवस शांत बसून, पुन्हा दूध भेसळीचा गोरखधंदा जोरात सुरू होतो. याबाबत प्रशासनाला पूर्ण कल्पना असूनदेखील, दूध भेसळखोरांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर न होणारी कारवाई हे सामान्य नागरिकांना न उलगडणारे रहस्यच आहे. यामुळे मात्र प्रामाणिकपणे काबाडकष्ट करून दूध उत्पादन करणारा शेतकरी नेहमीच अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

नेहमी या ना त्या कारणाने अडचणीत सापडलेला दूध व्यवसाय आता भेसळखोरांमुळे अडचणीत सापडला आहे. प्रत्यक्ष दूध उत्पादनापेक्षा जास्त दूध हे भेसळीतून तयार होते. त्यामुळे दुधाचे दर नेहमी कमी-जास्त होत असतात. त्याला स्थिरता प्राप्त होत नाही. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ सुरू आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे जिल्हा गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकत बनावट दूध निर्मितीचा संतापजनक खेळ उघड केला. याठिकाणी पॅराफिन (मिनरल ऑईल 9.5) या रासायनिक द्रव्याचे मिल्क क्रीम आणि पाण्यासोबत मशीनद्वारे मिश्रण करून घातक क्रीम तयार केली जात होती.

धक्कादायक बाब म्हणजे 1 लिटर क्रीमपासून तब्बल 20 लिटर बनावट दूध तयार केले जात होते. म्हणजेच थेट लोकांच्या आरोग्यावर रासायनिक बॉम्बच टाकला जात होता. ही मिल्क क्रीम देवळाली प्रवरा येथील एका गोडाऊनमध्ये तयार केली जात होती. याप्रकरणी प्रशासनाने काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाईदेखील केली. मात्र एकाच ठिकाणी कारवाई होऊन थांबून चालणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये दूध भेसळीचे प्रकार उघड करण्यासाठी भरारी पथक नेमून कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच दूध भेसळ करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई होऊन पुन्हा त्यांना दूध संकलन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

दूध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. तसेच शेतीपूरक व्यवसायामध्ये दूध व्यवसायाचा अग्रक्रम लागतो. परंतु हा व्यवसाय नेहमी या ना त्या कारणाने अडचणीत सापडलेला आहे. शासनाने संबंधित विभागाला कडक सूचना देऊन दूध भेसळ बंद करण्यासाठी पावले उचलली, तर नक्कीच ग्रामीण भागाचा कणा असलेल्या दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

श्रीरामपूर तालुक्यातही अनेक ठिकाणी भेसळ
दूध भेसळीत श्रीरामपूर तालुकाही मागे नाही. खंडाळा ते उक्कलगाव असे मोठे कनेक्शन यात सक्रीय असल्याची चर्चा असून खंडाळ्यातून कच्चा माल आणून उक्कलगावमध्ये मोठ्या प्रमणात बनावट दूध तयार केले जाते. अन्न व पुरवठा विभागाच्या तसेच पोलीस खात्यातील काही अधिकार्‍यांना याची कल्पना असूनही केवळ ‘हितसंबध’ जोपासले जात असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते. वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : रक्तपेढीला मिळाले अखेर उद्घाटनाचे टॉनिक!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक भारतीय प्रतिभूती मुद्रणालय म्हणजेच इंडिया सियुरिटी प्रेसने आपल्या सीएसआर फंडातून दिलेल्या तीन कोटी बासष्ट लाख रुपये...