Saturday, April 25, 2026
HomeनगरPathardi : बनावट शिक्षक भरती प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Pathardi : बनावट शिक्षक भरती प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

खोट्या नियुक्ती आदेशावरून पाथर्डीतील दांपत्याची आर्थिक लूट || पैसे परत देण्यास टाळाटाळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दांपत्याची तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेशकुमार राम बागडे (वय 39, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ किरण बागडे याचा मित्र सुभाष माणिक खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी, सध्या पिसादेवी, छत्रपती संभाजीनगर) याने सन 2022 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधून जालना येथील संत कबीर विद्यालयाशी संलग्न असलेल्या सांची प्राथमिक विद्यालय, चेतनानगर येथे शिक्षक पदाच्या जागा असल्याचे सांगितले.

- Advertisement -

या जागांवर नियुक्ती करून देण्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, अशा एकूण 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर खेडकर याने संस्थाचालक लिंबराज रामचंद्र जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याशी भेट घडवून आणली. दोघांनी मिळून नोकरी निश्चित असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर रुपेशकुमार राम बागडे यांनी वेळोवेळी रोख, आरटीजीएस आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे एकूण 18 लाख 50 हजार रुपये दिले. तसेच दोघांना बनावट नियुक्ती आदेशही देण्यात आले. त्या आधारे रुपेशकुमार बागडे व त्यांच्या पत्नीने काही काळ शाळेत कामही केले. मात्र, त्यांना कोणताही पगार मिळाला नाही. दरम्यान, चौकशी केली असता संबंधित संस्थेची मान्यता शासनाने रद्द केल्याचे समोर आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली.

आतापर्यंत आरोपींकडून 5 लाख रुपये परत मिळाले असून उर्वरित 13 लाख 50 हजार रुपये देण्यास नकार देत फोनही उचलत नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सुभाष खेडकर व लिंबराज जाधव यांच्याविरोधात संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

कार – ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू

0
सिन्नर | वार्ताहर Sinnar सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात कार व आयशर ट्रकच्या झालेल्या भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि. २५...