भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
येथील एका शेतकर्याच्या शेतात गुप्तधन काढण्याच्या बहाण्याने रात्रीच्या वेळी कापूर, अगरबत्ती पेटवून पूजा आणि मंत्रतंत्र केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार असल्याचे राजूर पोलिसांकडून सांगण्यात आले असले, तरी पसार आरोपींची संख्या जास्त असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे.
एकनाथ दगडु भांगरे, (वय 57, रा. शेंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मंगळवारी दुपारी अडीच वाजता ते आपल्या शेतात मोटारीला पाणी भरत असताना ज्ञानेश्वर नामदेव लेंडे आणि त्याच्यासोबत तीन इसम त्यांच्या शेतात आले आणि चित्रकुटाचे औषध आहे का, अशी विचारणा केली. मात्र सदर औषध या परिसरात उपलब्ध नसल्याचे फिर्यादी यांनी सांगून तुम्ही या भागात कुठून आला, अशी विचारणा केली असता त्यातील एका व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत फिर्यादीचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्याच दिवशी रात्री दहा वाजता फिर्यादी शेतात गेले असता त्यांना आपल्या शेतात उजेड दिसला. त्यांनी सुदाम मारुती इदे आणि सुरेश भाऊराव भांगरे यांना बोलावून घेतले. तिघांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे आठ ते नऊ लोक अगरबत्ती व कापूर पेटवून पूजा करत असल्याचे दिसून आले. त्यातील एक इसम तुमच्या शेतातील गुप्तधन काढून देतो, त्यावरील भुताटकी काढण्यासाठी मंत्र बोलतो आणि निघणारे धन आपण वाटून घेऊ, असे म्हणत असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. गावकर्यांना पाहताच सदर इसम पळून जाऊ लागले. त्यांच्या पळून गेल्यानंतर त्या ठिकाणी खोदलेला छोटा खड्डा, त्यात पेटलेला कापूर, उदबत्ती व इतर पूजेचे साहित्य आढळून आले.
त्यानंतर गावातील राजेंद्र दगडू भांगरे, बाळू भाऊराव भांगरे, शिवाजी भाऊराव भांगरे यांच्या मदतीने पळून गेलेल्या इसमांचा शोध घेतला असता सात जण मिळून आले. त्या ठिकाणी एमएच 31 डिव्ही 9628 क्रमांकाची चारचाकी व एमएच 17 बीपी 9510 क्रमांकाची दुचाकी मिळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुप्तधन शोधण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांना शेंडी गावठाण येथील मारुती मंदिरात आणून नाव गाव विचारले असता त्यांनी आपली नावे योगेश गणेश वानखेडे, त्र्यंबक रावजी वानखेडे, अनंता कृष्णराव हिंगोले, गणेश रामहरी घोरपडे, रुपेश गणेश वानखेडे, ज्ञानेश्वर नामदेव लेंडे आणि संजय लक्ष्मण खाडे अशी सांगितली. यातील काही आरोपी हे अकोला जिल्ह्यातील असून दोन आरोपी हे अकोले तालुक्यातील आहेत .नंतर 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावण्यात आले. राजूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष कृत्य प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, भंडारदरा परिसर हा आदिवासी भाग समजला जातो. या भागात आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हा प्रकार घडला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याशिवाय या आरोपींमध्ये एक व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या राजकीय पदावर असल्याचे बोलले जात असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.




