अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक नोंदणीचे प्रमाण 79.74 टक्क्यांवर गेले असले तरीही अद्याप 2 लाख 18 हजार शेतकर्यांनी हे कार्ड काढले नाहीत. मध्यंतरी पोर्टलवरील अडचणींसह प्रशासकीय यंत्रणांकडूनही लवकर मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे या कामाची गती संथ झाली होती.
नगर जिल्ह्यात 10 लाख 76 हजार 298 शेतकरी आहेत. यापैकी 8 लाख 58 हजार 252 शेतकर्यांनी फार्मर आयडी काढला असून 2 लाख 18 हजार 46 शेतकर्यांची नोंदणी बाकी आहे. जिल्ह्यात अकोले, पारनेर व जामखेड तालुक्यांचा फक्त या कामाचा टक्का 90 च्या पुढे सरकला आहे. इतर तालुक्यांत मात्र 68 ते 89 टक्के असे प्रमाण दिसत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आता हे कार्ड असल्याशिवाय मिळत नाही.
अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कमही अॅग्रिस्टॅक असलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर लागलीच पडली. इतरांना मात्र हे कार्ड काढण्याची तसदी घ्यावी लागली. त्यानंतर अनेकांनी अर्ज करण्यासाठी घाई केल्याने मध्यंतरी पोर्टलच जायबंदी झाले होते. पुन्हा त्यात गती आली तर अधिकारी निवडणुकांच्या कामात अडकले होते. आता पुन्हा काही प्रमाणात का होईना, गती आली आहे. मागील महिनाभरात नवीन कार्ड काढणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
फार्मर आयडी हा शेतकर्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पीक कर्ज, सबसिडी, बियाणे, खते, कृषी अवजारे आणि इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक असून, यामुळे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होते.
अॅग्रीस्टॅकची टक्केवारी
नगर 68.37, नेवासा 72.50, श्रीगोंदा 78.89, पारनेर 92.89, पाथर्डी 71.64, शेवगाव 79.16, कर्जत 87.77, जामखेड 93.54, संगमनेर 73.63, अकोले 94.46, श्रीरामपूर 89.57, राहुरी 81.82, राहाता 76.16 आणि कोपरगाव 75.75 अशी अॅग्रीस्टॅकची नोंदणी झालेली आहे.




