Monday, September 16, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा; ३४८ गावे आणि ८७२ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा...

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा; ३४८ गावे आणि ८७२ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु

राज्यातील १० हजार गावांना ३,५०० टँकरने पाणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रासह (North Maharashtra) राज्यातील २४ जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती शनिवार (दि.२५ मे) पर्यंत राहणार आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाणीटंचाई (Water Shortage) जाणवत असून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच चाराटंचाईमुळे (Fodder Shortage) पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा हा पश्न सोडवण्यासाठी सरकार त्या-त्या पातळीवर उपाययोजना कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाणीटंचाईच्या संदर्भात नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) विचार केला असता सध्या जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्याने पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ३४८ गावे आणि ८७२ वाड्या अशा एकूण एक हजार २२० गाव-वाड्यांना ३७० टॅंकरच्या ८१४ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय आणि ३५६ खासगी टॅंकरचा समावेश आहे. तर टॅंकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात गावांसाठी ६१, तर टॅंकरसाठी १३४ विहिरींचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे प्रशासन, शासन यांनी आता या गोष्टींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. तसेच जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत पाणीटंचाईबाबत आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

धरणांमध्ये २४.२४ टक्के जलसाठा

उन्हाच्या झळा आणि स्थानिक जलस्त्रोत आटू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढू लागली आहे. राज्यभरातील
धरणांमध्ये जेमतेम २४.२४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यात २३ जिल्ह्यातील १० हजार गावे आणि पाड्यांना ३,५०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चारा छावण्यांची गरज

राज्यात अनेक ठिकाणी चारा नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. राज्यात तातडीने चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत अवकाळी पावसाच्या तडाख्याने आधीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील चाराटंचाईचा विचार केल्यास जिल्ह्यात लहान मोठी जनावरे, शेळ्या-मेंढ्या धरून एकूण १९ लाखाहून अधिक जनावरे आहेत. या सर्व जनावरांना प्रतिमहिना एक लाखाहून अधिक टन चारा लागतो. मात्र सध्या जिल्ह्यात फक्त तीन लाख ७० हजार टन चारा उपलब्ध आहे. हा चाऱ्याचा साठा जूनअखेर पुरेल इतकाच आहे. तसेच दोन लाख जनावरांची तहान २८६ टँकरद्वारे भागविली जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पाणी आणि चाराटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

राज्यात ४५ दिवस पुरेल एवढाचा चारासाठा?

राज्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगत असल्याचे कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच जर चारा उपलब्ध असेल तर मग चारा छावण्या सुरु करण्यासाठी महाभ्रष्टयुती सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे? राज्यात तातडीने चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आधीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेतकरी चारी बाजूनी संकटाने घेरला असून त्याला आधार देण्यासाठी सरकारने तातडीने उपयायोजना कराव्यात, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

नाशकात शनिवारी पाणीबाणी

नाशिक शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे आदी देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मनपा क्षेत्रात शनिवार (दि. २५) रोजी दिवसभर तर रविवार (दि. २६) रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग संजय अग्रवाल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या