अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मालमत्ता विकून त्याचे पैसे देण्यासाठी मुलाने वडिलांना मारहाण केली. त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या व एक लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी (1 फेब्रुवारी) सकाळी पावणे दहाच्या सुमारास माळीवाडा परिसरात घडली. याप्रकरणी पंडित नारायण खरपुडे (वय 70) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा नीलेश पंडित खरपुडे (रा. संदीपनगर, सारसनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास नीलेश त्यांचे वडिल राहत असलेल्या घरी आला. ‘अक्षता गार्डन प्रॉपर्टी तात्काळ विकून पैसे दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर त्याने त्यांना मारहाण केली. नीलेशने फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी खेचून घेतली तसेच घरातील कपाटातून एक लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. याशिवाय फिर्यादीचा मोबाईल आणि दुचाकीचेही नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक के. एस. कपिले अधिक तपास करत आहेत.