Thursday, June 18, 2026
Homeक्राईमCrime News : पत्नी सोडून गेल्याच्या रागातून चिमुरडीचा खून; मुलालाही मारण्याचा प्रयत्न

Crime News : पत्नी सोडून गेल्याच्या रागातून चिमुरडीचा खून; मुलालाही मारण्याचा प्रयत्न

घारगाव |वार्ताहर| Ghargaon

पोटचा बापच जेव्हा मुलांचा काळ बनतो, तेव्हा माणुसकीही थरारते. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून आणि कौटुंबिक वादातून एका निर्दयी पित्याने आपल्या दोन चिमुरड्या मुलांचा गळा आवळून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याची विदारक घटना जुन्नर तालुक्यातील संतवाडी (आळेखिंड) परिसरात उघडकीस आली आहे. या क्रूर कृत्यात साडेतीन वर्षांच्या हर्षदाचा मृत्यू झाला, तर पाच वर्षांचा आर्यन मृत्यूच्या दाढेतून परतला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. सागर सदाशिव शिंदे (वय 29, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागरची पत्नी 6 महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेली होती. मुलांचा सांभाळ करताना होणारी चिडचिड आणि कौटुंबिक विवंचनेतून त्याने दोन्ही मुलांना संपवण्याचा भयानक कट रचला. मंगळवारी (दि.5) सकाळी बाहेर फिरायला नेतो असे सांगून त्याने आर्यन (5 वर्ष) आणि हर्षदा (3.5 वर्ष) यांना घराबाहेर नेले. रात्री 11:30 वाजेच्या सुमारास त्याने या चिमुरड्यांना संतवाडी (ता. जुन्नर) हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या निर्जन जंगलात नेले. तिथे त्याने प्रथम आर्यनचा गळा दाबला. आर्यन निपचित पडल्यावर तो मृत पावल्याचे समजून नराधम बापाने त्याला तिथेच सोडून दिले. त्यानंतर त्याने आपली मुलगी हर्षदा हिचा अत्यंत क्रूरपणे गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झाडाझुडूपात फेकून दिला.

बुधवारी सकाळी आर्यन शुद्धीवर आला आणि रडत रडत पुणे-नाशिक महामार्गावर पोहोचला. तिथे उपस्थित प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी तत्काळ आळेफाटा पोलिसांना कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करणार्‍या सागरने पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळकर, पोलीस कर्मचारी दत्तात्रेय चौगुले, भोजराज मिसाळ, तांगडकर व त्यांच्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून आरोपीला जेरबंद केले. आरोपीवर खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...