Wednesday, August 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआदिवासींच्या हक्कांसाठी संविधानाच्या मार्गाने संघर्ष करा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

आदिवासींच्या हक्कांसाठी संविधानाच्या मार्गाने संघर्ष करा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

संविधानाच्या जीवावर उठलेले मनुवादी विचार म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असून, हेच विचार आता आरक्षणाच्या मुळावर उठले आहेत, तर आदिवासींकडून जल, जंगल आणि जमीन हिरावून घेतली जात असल्याचा आरोप करत आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणार्‍या शक्तींविरोधात संविधानाच्या मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे, शहराध्यक्ष बबलू खैरे, नगरसेविका मयुरी पवार, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, किरण खाडम आदी उपस्थित होते.

यावेळी सपकाळ म्हणाले, आदिवासींची जमीन दुसरे कुणी खरेदी करू शकत नाही, हा अधिकार संविधानाने दिला आहे. मात्र, सरकारकडून टेबलाखालून पैसे घेऊन आदिवासींच्या जमिनी ९९ वर्षांच्या करारावर दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आज देशात दोनच जाती राहिल्या आहेत. एक म्हणजे शोषण करणारी आणि दुसरी पीडित वंचित, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आता रडायचे नाही, तर आपल्या अधिकारांसाठी लढायचे आहे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. काँग्रेसने आरक्षण लागू केले, त्यावेळी पहिला अधिकार आदिवासी समाजाला दिला.

कोयता-दगड नव्हे, संविधान हातात घ्या
आपल्याला हातात कोयता किंवा दगड घेऊन लढायचे नाही. त्याऐवजी संविधान हातात घेऊन अन्याय करणार्‍या शक्तींविरोधात लढा उभारायचा आहे, असे सपकाळ म्हणाले.

जेन-झी चे वादळ उठले
देशात जेन-झी नावाचे वादळ उठले आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे तरुण घरात बसून राहिले नाहीत, तर दिल्लीपर्यंत गेले आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी समाजालाही आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करावा लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांना जितका काळ सत्तेपासून दूर ठेवले जाईल, तितक्या काळात आदिवासी व वंचित समाजावर अन्याय सुरूच राहील, असा दावाही सपकाळ यांनी केला.

ताज्या बातम्या