मुंबई | Mumbai
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज (रविवारी) मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’ (Garjana Morcha) मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
यावेळी ते म्हणाले की,” आजचा मोर्चा केवळ राजकीय आंदोलन नसून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीच्या रक्षणाचा लढा आहे. त्यामुळे या लढ्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व नेत्यांसह उपस्थितांचे आभार मानतो. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली होती. पंरतु, आज ते देशात हुकूमशाही राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही हुकूमशाह बनणार असाल, तर जनता तुमची ही हुकूमशाही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली.
हे देखील वाचा : Raj Thackeray : “देशात वोट चोरीमुळे वातावरण तापलंय अन् इथे…”; राज ठाकरेंचा केंद्रीय निवडणूक आयुक्तांवर घणाघात
ज्ञानेश कुमार केंद्र सरकारचे हत्यार
पुढे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्यावर टीका करतांना ते म्हणाले की,”ज्ञानेश कुमार हे केंद्र सरकारचे हत्यार असून, ते अडाण्यासारखे काम करत आहेत. ज्ञानेश कुमार म्हणजेच अडाणी कुमार आहेत. त्यांना दिलेले सुरक्षा कवच राष्ट्रपतींपेक्षाही जास्त आहे. देश काय ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच राष्ट्रपतींची निवडणूक होते, मग मुख्य निवडणूक आयुक्तांची का होत नाही? आधी या प्रक्रियेत सरन्यायाधीश (CJI) होते, पण सरकारने कायदा बदलून त्यांना बाहेर काढले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना थांबण्याचे आवाहन केले होते, तरीही सरकारने पक्षपातीपणा करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांची तातडीने नेमणूक केली असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून अधिकार वापरतात
तसेच “मी राज आणि बाळासाहेब थोरातांचे भाषण ऐकले. त्यांच्या भाषणात संपूर्ण देशात १३ कोटी मतदार वगळले असे सांगण्यात आले. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या कमी करण्यात आली असून, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत मतदार वगळण्यात आले आहेत. त्यातील काही वैध असून, आता तिथे पोट निवडणूक होणार आहे. एसआयआर हा गैरकायदा असून, व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करण्याचा एक प्रकारचा अधिकार आहे. अमित शाह हे ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून हा अधिकार वापरत असून, सर्वत्र मतदार वगळले जात आहे”, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.




