राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
मुळा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांसाठी पहिल्या पाण्याच्या आवर्तनाची तारीख निश्चित झाली असून, साधारण 20 डिसेंबरदरम्यान कालव्यातून 500 एमसीएफटी पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकर्यांनी चारपिकांची लागवड करावी असे आवाहन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील खरेदी व निविदा प्रक्रियेत 35 ते 40 लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आ. प्राजक्त तनपुरे यांनी केला. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. मुळा कालवा समितीच्या बैठकीत पहिल्या आवर्तनाबाबत चर्चा झाली. त्यानुसार 20 डिसेंबरदरम्यान पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या आवर्तनातून सुमारे 500 एमसीएफटी पाणी उपलब्ध होणार आहे. धरणातील पाणीसाठा, उपलब्धता आणि शेतीची गरज लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचे नियोजन केले जाईल. साधारण दीड ते दोन महिन्यांनंतर दुसरे आवर्तन सोडण्याची शक्यता असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले. विद्यापीठातील खरेदी प्रक्रियेबाबत आ. तनपुरे म्हणाले की, सुमारे 35 ते 40 लाख रुपये किमतीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी एकत्रित ई-निविदा काढण्याऐवजी पाच लाख रुपयांच्या आतील मर्यादेत सात ते आठ स्वतंत्र खरेदी दाखवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. एकाच प्रकारच्या साहित्याची खरेदी वेगवेगळ्या कोटेशनमध्ये विभागून निविदा प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, एकाच दिवशी अनेक कोटेशन मागवून त्याच दिवशी वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित वर्क ऑर्डरचे क्रमांकही सलग असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
काही साहित्य बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच कागदोपत्री मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी दाखवले असले तरी प्रत्यक्षात ते बसवण्यात आले आहे का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे काही फर्मच्या नावाने कोटेशन दाखवण्यात आले असले, तरी संबंधित फर्मनी विद्यापीठाला लेखी कळवून आपण कोटेशन दिले नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा तनपुरे यांनी केला. काही कोटेशन व बिलांवरील सह्या बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित फर्मच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाने कागदपत्रे तयार केली असतील, तर हा प्रकार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरू शकतो, असे ते म्हणाले.
या बाबी निदर्शनास आल्यानंतर विद्यमान कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली असून, संबंधित बिलांची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठातील खरेदी प्रक्रिया, कोटेशन, वर्क ऑर्डर, बिले, साहित्याची प्रत्यक्ष उपलब्धता आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी तनपुरे यांनी केली.
विद्यापीठातील वसतिगृहांच्या बांधकाम निविदांमध्ये जिओ टॅगिंगची अट घालण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. या अटीमुळे सर्व ठेकेदारांना समान संधी मिळाली का, की काही ठरावीक ठेकेदारांना फायदा झाला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात विधानमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याची माहितीही त्यांनी दिली.सध्या समोर आलेल्या बाबींची पडताळणी सुरू असून, संबंधित कागदपत्रे आणि पुरावे तपासले जात आहेत. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. चौकशी आणि पुढील कारवाईवर आपले लक्ष राहणार असल्याचे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले.




