अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच इतर भागांतून किंवा इतर राज्यांतून चारा उपलब्ध करून द्यावा. राज्य सरकारने शेतकर्यांसोबतच शेत मजूरांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगरमध्ये केली.
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या गंभीर समस्यांवर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी थोरात यांनी सांगितले की, यंदा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीनसारखी पिके शेतातून काढण्यासाठीच चार ते पाच हजार रुपये खर्च येतो, परंतु शेतकर्यांच्या हातात काहीही उरलेले नाही. पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामही हाती येण्याची शक्यता उरलेली नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट होणार असून, विशेषतः दुधाळ जनावरांचे संगोपन करणे शेतकर्यांसाठी कठीण झाले आहे.
पिकेच नसल्यामुळे शेतात काम करणार्या मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. रोज कमावून रोज खाणार्या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्यांसोबतच या शेतमजुरांसाठीही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच इतर भागांतून किंवा इतर राज्यांतून चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाच्या सुरुवातीलाच आम्ही सरकारवर थेट आरोप करू इच्छित नाही, परंतु सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असा सूर थोरात यांनी आळवला.
आगामी 10 महिने अतिशय कठीण जाणार असून राज्यासमोर दुष्काळाचे मोठे संकट आहे. पाणी, चारा, पशुधन आणि शेतकरी-शेतमजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनणार आहे. शेतकरी सध्या मोठ्या अडचणीतून जात असून त्यांना वेळोवेळी पाठबळ देणे गरजेचे आहे. कर्जमाफीचे टप्पे केल्यामुळे व्याजाचा व बँकेचा नवा प्रश्न उभा राहिला असून सरकारने यावर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
साखर कारखानदारी पुढील आव्हाने
उसाची उपलब्धता कमी असणे, पावसाअभावी वजनात झालेली घट आणि कारखान्यांची क्षमता वाढल्यामुळे चालू गळीत हंगाम 100 दिवसही टिकेल की नाही अशी भीती आहे. साखर कारखानदारी वाचवण्यासाठी सरकारने व सर्व संबंधितांनी एकत्र येऊन तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




