श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राज्यभरात दुष्काळाचे सावट असताना आणि ऐन दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आलेले असताना, राज्यभरातील अन्नधान्य वितरण व्यवस्था सर्व्हर अपडेटच्या नावाखाली सलग बारा दिवसांपासून ठप्प झाली आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत गोरगरिबांना अन्नधान्याचा पुरवठा करणारी स्वस्त धान्य दुकाने दुकानांमध्ये माल उपलब्ध असूनही पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षापासून शासनस्तरावरून प्रत्येक महिन्याचे धान्य वेळेत पोहोचवून महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच किंवा पहिल्या आठवड्यात वितरण सुरू करण्याचे धोरण राबवले जाते.
तालुकास्तरावरूनही दुकानदारांना पहिल्या पंधरवड्यात वितरण पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातो. त्यानुसार, चालू महिन्यातही कार्डधारकांनी महिन्याच्या सुरुवातीपासूनच धान्यासाठी दुकानांमध्ये फेर्या मारण्यास सुरुवात केली होती. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात ई-पॉस मशीनचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आल्यामुळे, ते सुरळीत चालत नसल्याने संपूर्ण वितरण प्रणाली कोलमडली आहे. राज्यात गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील 52 हजार 689 स्वस्त धान्य दुकानांमधील वितरण प्रक्रिया थांबली आहे. केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातच अशा 1898 दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत गहू व तांदूळ वाटला जातो. दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असूनही केवळ मशीन बंद असल्यामुळे दुकानदारांना वाटप करणे शक्य होत नाही.
धान्य आले असल्याची पूर्वकल्पना असल्याने रोजंदारी करणारे मजूर आणि गरीब नागरिक आपले कामधंदे सोडून रोज सकाळी दुकानांसमोर रांगा लावून बसत आहेत. मात्र, मशीनमध्ये स्टॉक दाखवत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही ठिकाणी कार्डधारक व दुकानदारांमध्ये वादही होत असल्याचे चित्र आहे. कार्डधारकांचे म्हणणे आहे की, आम्हाला धान्य द्या, अंगठा कधीही घ्या, तर दुकानदारांचे म्हणणे आहे की, ई-पॉस मशीनवर पावती निघाल्याशिवाय धान्य देणे नियमानुसार शक्य नाही. शासनाने हे काम एका खासगी कंपनीला दिले असून, त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे.
तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
बाजारपेठेमध्ये इतर अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे सणासुदीच्या काळात महागडे धान्य विकत घेणे गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणेने तातडीने या तांत्रिक समस्येची दखल घेऊन सर्व्हर सुरळीत करावे आणि ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेला हा पेचप्रसंग लवकरात लवकर सोडवावा, अशी आर्त हाक सर्वसामान्य जनतेकडून दिली जात आहे.




