Friday, June 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोर्चाची दखल दिल्लीलाही घेण्यास भाग पाडा! - राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मोर्चाची दखल दिल्लीलाही घेण्यास भाग पाडा! – राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

१ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षाचा मोर्चा

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढण्यात येणारा मोर्चा हा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. तो खऱ्या मतदारांसाठी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चाचा आवाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने मोर्चाचे आयोजन करा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मतदार यादीतील बोगस मतदारांचा समावेश, मतदार याद्यांमध्ये असलेल्या असंख्य चुका, दुबार नावे, एकाच घरात राहत असलेले शेकडो मतदार याविरोधात आवाज उठवत शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस या पक्षांनी येत्या १ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

या मोर्चाच्या तयारीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाची भूमिका स्पष्ट केली. आपला लढा किंवा आपला जो विचार आहे तो खऱ्या मतदारांसाठी आहे, खोट्या मतदारांसाठी नाही. हे जनतेपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवावे लागणार आहे. आणि तेच या मोर्चाच्या माध्यमातून करायचे आहे. त्यामुळे या मोर्चाचा आवाज, मतदार याद्यांमधील घोळाचा आवाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीची गर्दी या मोर्चात अपेक्षित आहे. न भूतो, न भविष्यती असा मोर्चा मुंबईत झाला पाहिजे. त्यापद्धतीने नियोजन करा, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.

संजय राऊत यांनी घेतली भेट
ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात येणारा मोर्चा कुठून काढायचा हे ठरले नसले तरी त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. दरम्यान, निवडणूक आयोगावरील मोर्चा गिरगाव चौपाटी येथून काढला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

ताज्या बातम्या

Crime News : मौजमजेसाठी चोरलेल्या 12 दुचाकींसह सराईत चोरटा जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तोफखाना पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. विशेष म्हणजे केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणार्‍या या चोरट्याकडून तब्बल 12 दुचाकी जप्त...