Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमAhilyanagar : माजी महापौर कळमकरचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Ahilyanagar : माजी महापौर कळमकरचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

जिल्हा न्यायालयाचा निर्णय || महिलेवरील अत्याचार प्रकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर (वय 35, रा. भूतकरवाडी, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी नामंजूर केला.

- Advertisement -

शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी अभिषेक कळमकर याने फिर्यादीची आर्थिक परिस्थिती पाहून तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्या निमित्ताने त्यांनी तिला वाहनातून विळद घाट परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेले व तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्या घटनेनंतरही अभिषेकने पीडित महिलेशी वारंवार व्हिडिओ कॉलव्दारे संपर्क साधून अश्लील हावभाव केले व तिला देखील तसे करण्यास भाग पाडले. शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिषेकने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडित महिला अत्यंत गरीब असून ती नोकरीच्या शोधात होती. संशयित आरोपी हा राजकीय नेता व शहराचा माजी महापौर असल्याने त्याने नोकरीचे आमिष दाखवून तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल जप्त करणे तसेच पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याने आरोपीची कोठडीतील चौकशी गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपीला जामीन दिल्यास तो पीडितेवर दबाव आणू शकतो, पुरावे नष्ट करू शकतो किंवा तपासात अडथळा निर्माण करू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे.

ताज्या बातम्या