धुळे | Dhule
विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांच्यावर आज धुळे (Dhule) येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. देवपुरातील (Deopur) नेहरु हौसिंग सोसायटीतील निवासस्थानापासून फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेने एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खा. डॉ.शोभा बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, ॲड. के.सी. पाडवी, जयकुमार रावल, सत्यजित तांबे, हिरामण खोसकर, शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, तहसीलदार पंकज पवार, अरुण शेवाळे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आप्तेष्ट, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी घेतले अंत्यदर्शन
प्रारंभी, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जावून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा