नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (92) यांचे आज रात्री 10 वाजेच्या सुमारास निधन झाले. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली. सन 2004 साली यूपीए सरकारने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. मात्र त्यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसर्यांदा पंतप्रधान बनले.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन 1966 ते 1969 याकाळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 याकाळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1991 मध्ये मनमोहन सिंग हे आसामचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ते 1995, 2001, 2007 आणि 2013 मध्ये पुन्हा राज्यसभा खासदार होते.
1998 ते 2004 पर्यंत भाजप सत्तेत असताना ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 1999 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरही राहिले आहेत. दरम्यान, बंगळुरूमध्ये आजपासून काँग्रेस कार्यकारिणीचे अधिवेशन सुरू झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते बंगळुरूत होते. मात्र मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तातडीने दिल्लीकडे रवाना झाले.