मुंबई | Mumbai
कोकणातील राजापूर विधानसभेचे ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Former MLA Rajan Salvi) यांनी ‘शिवबंधन’ तोडत अखेर ‘धनुष्यबाण’ हातात घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद मठाजवळ शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या गळ्यात शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचे उपरण घालत त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत (MLA Kiran Samant) आणि राजन साळवी उपस्थित होते. यावेळी राजन साळवी यांनी “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ का सोडली? याचे कारणही सांगितले होते. ते म्हणाले की, “मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते. त्यानंतर वाटलं आता थांबाव, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभं राहिलं पाहिजे असं आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीने विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ” असे त्यांनी सांगितले होते.
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९३ ते ९४ च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होते. तसेच राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळले होते. २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून आले होते. याशिवाय २००९ आणि २०१४ मध्येही राजन साळवी हे विधानसभेत विजयी झाले. तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला होता. त्यानंतर साळवी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता.