मुंबई | Mumbai
सप्टेंबर महिन्याचा शेवट जवळ येत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा उकाडा वाढू लागला आहे. अनेक भागांत पावसाने घेतलेली विश्रांती पावसाची झालेली तूट आणि मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला झालेली सुरुवात यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असल्यामुळे सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा अनुभव येत असल्याचे चित्र आहे. जळगावमध्ये ३५ अंशांच्या पुढे तापमान जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर लातूर आणि धाराशिवमध्येही सप्टेंबरमध्ये उष्णतेची तीव्रता जाणवत असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत महाराष्ट्रातील कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात दिवसाच्या उष्णतेसोबतच रात्रीच्या तापमानातही वाढ जाणवू शकते.
एकट्या नाशिक जिल्ह्यात या महिन्यात पावसाची तब्बल ७० टक्के तूट नोंदविली गेली आहे. गेल्या १५ दिवसांत कमाल तापमानात सात अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती आहे. तर तिकडे छत्रपती संभाजी नगरमध्ये 35.8 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. सप्टेंबर महिन्यात नोंदवलं गेलेले हे मागील २५ वर्षांच्या तुलनेतलं हे उच्चांक तापमान असल्याची माहिती आहे.
मान्सूनच्या परतीचा परिणाम
महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याच्या टप्प्यावर आहे. उपलब्ध हवामान अंदाजानुसार, राज्यातून मान्सूनची माघार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबरच्या आसपास माघारीची प्रक्रिया सुरू होऊन १० ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या मोठ्या भागातून मान्सून मागे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनचा प्रभाव कमी होताच आकाशातील ढगांचे प्रमाण कमी होणे, सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडणे आणि वातावरणातील आर्द्रता टिकून राहणे अशा परिस्थितीमुळे उकाडा वाढू शकतो. त्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’ची चाहूल सप्टेंबरअखेरपासूनच जाणवू लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील चार जिल्ह्यांत उष्णतेचा चटका
रविवारी राज्यातील चार जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर आणि अमरावतीमध्ये रविवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भातील अकोल्यात 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी आगामी काळात देखील तपामाना पार वाढत राहण्याचे संकेत आहे.
महाराष्ट्रात पावसाची तूटही कायम
उष्णता वाढत असतानाच महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनच्या पावसाची तूटही चिंतेचा विषय बनली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात सामान्य ९५३.२ मिमीच्या तुलनेत ७८७.२ मिमी पाऊस नोंदवला गेला असून, राज्याची एकूण पावसाची तूट सुमारे १७ टक्के होती. देशाची तूट १५ टक्के होती.
अहिल्यानगरमध्ये ४२ टक्के, सांगलीत २४ टक्के, सोलापुरात तब्बल ५७ टक्के आणि नंदुरबारमध्ये ३४ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली होती. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हंगामी पावसाची स्थिती सामान्य किंवा सरासरीपेक्षा अधिक राहिली आहे.
उष्णतेपासून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
तापमान वाढत असताना नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. आर्द्रता अधिक असल्यास प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक जाणवू शकतो. एकीकडे राज्यातून मान्सूनची माघार सुरू होत आहे, तर दुसरीकडे काही भागांत अजूनही पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरअखेरपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्रात ‘पाऊस विरुद्ध उष्णता’ असे मिश्र हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.




