अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील पुणे बसस्थानकावर भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका वृध्द व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच केडगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेल्या एका वृद्धाचीही भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून दोघांनी 50 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष गायकवाड (वय 68, रा. समतानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास केडगाव वेस परिसरात बसले होते. यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने मी खूप मोठा ज्योतिषी आहे, तुमचे भविष्य पाहतो असे सांगून गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. एका दगडाचा रुद्राक्ष करून दाखवत भामट्यांनी त्यांना भुरळ घातली. त्यानंतर भविष्य पाहण्यासाठी बोटातील अंगठी 20 रुपयांच्या नोटेत गुंडाळून ठेवा असे त्यांना सांगण्यात आले. गायकवाड यांनी विश्वासाने 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून दिली.
आरोपीने सदर अंगठी नोटेत गुंडाळून त्यांच्या शर्टाच्या खिशात टाकल्याचा बनाव केला. काही वेळाने दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. संशय आल्याने गायकवाड यांनी खिशाची तपासणी केली असता, त्यात अंगठी आणि 20 रुपयांची नोट मिळून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. फिर्यादीनुसार, एक आरोपी 35 वर्षांचा असून त्याने पांढरा शर्ट घातला होता, तर दुसरा 25 ते 30 वयोगटातील आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




