फलटण । Phaltan
फलटण तालुक्यातील खामगाव येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाला. कुटुंबप्रमुखाला वाचवण्याच्या धडपडीत एकमेकांना वाचवायला गेलेले पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा चौघांचाही जागीच अंत झाला. या भयंकर दुर्घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, खामगाव गावाला अश्रू अनावर झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८), त्यांची पत्नी गंगू सतीश शिंदे (वय ४०), मुलगा सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती सतीश शिंदे (वय २४) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत. हे कुटुंब खामगाव येथील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ वास्तव्यास होते.
बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुटुंबप्रमुख सतीश शिंदे हे नेहमीप्रमाणे घरातून बाहेर आले. घराबाहेर असलेल्या वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना अचानक विजेचा जोरदार झटका बसला. ते विजेच्या तारेला चिकटल्याचे पाहताच, त्यांच्या पत्नी गंगुबाई यांनी पतीला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. आई आणि वडिलांना मृत्यूच्या दारात पाहून मुलगा सचिन आणि मुलगी आरती यांनीही त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, विजेचा प्रवाह इतका भयानक होता की, एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचाही काही क्षणातच जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच खामगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
या दुर्दैवी घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सांगितले की, “हा अपघात विद्युत खांबावरील घरगुती कनेक्शनची तार जोडताना झाला की बल्ब काढताना झाला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये नेमका वीज प्रवाह कसा उतरला? यामागे महावितरणचा कोणताही तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा शोध घेतला जात आहे.” अवघ्या काही मिनिटांत हसतं-खेळतं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्युत उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




